बोगस स्वाक्षरी करुन बँकेतून पाच लाख रुपये काढण्याचा प्रयत्न
फसवणुकीप्रकरणी सामाजिक संस्थेच्या कर्मचार्याला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जून 2025
मुंबई, – अंधेरीतील एका सामाजिक संस्थेच्या व्यावसायिक मालकाची बोगस स्वाक्षरी करुन बँकेतून पाच लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी कर्मचार्याला आंबोली पोलिसांनी अटक केली. श्रीकांत शिवशंकर गडतिया असे आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. श्रीकांत एक दिवसांपूर्वी मालकाची बोगस स्वाक्षरी करुन कंपनीच्या दिड लाखांचा अपहार केला होता, इतकेच नव्हे तर मालकाशी संबंधित विविध बँकेच्या वेगवेगळ्या 55 धनादेशावर बोगस स्वाक्षरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. भाचीच्या उपचारासाठी त्याने ही फसवणुक केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.
बॉबी विजयचंद्र मोहंती हे जुहू परिसरात राह असून व्यवसायाने व्यावसायिक आहेत. ते मालदिव देशाचे ऑननरी कॉन्सुलेट जनरल असून टेक इंजिनिअरींग या कंपनीत अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांची स्वतची बॉबी मोहंती फाऊंडेशन ट्रस्ट नावाची एक सामाजिक संस्था असून ही संस्था गरीब लोकांना मदत करते. अंधेरीतील विरा देसाई रोडवर संस्थेचे एक कार्यालय असून तिथे आठ कर्मचारी कामाला आहेत. श्रीकांत हा गेल्या सहा वर्षांपासून तिथे शिपाई म्हणून कामाला आहे. त्याच्यावर बँकेत धनादेश जमा करणे, कागदपत्रांची ने-आण करणे आदी कामाची जबाबदारी आहे.
4 जूनला त्यांच्या संस्थेच्या बँकेत एक व्यक्ती पाच लाख रुपयांचा धनादेश घेऊन आला होता. या धनादेशावर संशय आल्याने बँकेचा कर्मचारी इर्शाद शेख यांनी बॉबी मोहंती यांना कॉल करुन ही माहिती दिली होती. यावेळी त्यांनी कोणालाही पाच लाखांचा धनादेश दिला नसल्याचे सांगितले. त्यानंतर इर्शादने त्यांना धनादेशचा फोटो व्हॉटअपवर पाठविला होता. तो फोटो पाहिल्यांनतर त्यांची कोणीतरी बोगस स्वाक्षरी करुन बँकेतून पाच लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी इर्शाद शेखला कॉल करुन पेमेंट स्टॉप करण्याची विनंती केली होती. या घटनेनंतर ते बँकेत गेले होते. तिथे त्यांना श्रीकांत गडतिया हा त्यांचा संस्थेचा धनादेश घेऊन आल्याचे समजले. 3 जूनला त्याने त्याने त्यांच्या टेक इंजिनिअरिंग कंपनीच्या धनादेशावर त्यांची बोगस स्वाक्षरी करुन दिड लाख रुपये स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते.
इतकेच नव्हे तर त्यांच्या विविध बँकांच्या 55 धनादेशावर त्यांच्या बोगस स्वाक्षरी केल्याची कबुली दिली. ते सर्व धनादेश नंतर त्याने त्यांना दिले होते. चौकशीअंती श्रीकांतची भाची आजारी असून तिच्या ऑपरेशनसाठी त्याने त्यांची बोगस स्वाक्षरी करुन दिड लाखांचा अपहार केला होता. दुसर्या दिवशी तो पुन्हा बँकेत आला आणि त्याने पाच लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच बॉबी मोहंती यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर श्रीकांतविरुद्ध फसवणुकीसह अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.