एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना गुन्हे शाखेकडून उद्धवस्त
दहाजणांच्या टोळीला मुंबईसह सुरत व सांगलीतून अटक २५२ कोटी ५५ लाखांचा एमडीसह इतर मुद्देमाल हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – गेल्या सहा महिन्यांपासून सांगलीतील महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या एमडी ड्रग्जच्या कारखान्यांचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दहाजणांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. परवीनबानो गुलाम शेख, साजिद मोहम्मद आसिफ शेख ऊर्फ डेबस, इजाजअली इमदादअली अन्सारी, आदित्य इम्तियाज बोहरा, प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे, वासुदेव लक्ष्मण जाधव, प्रसाद बाळासो मोहिते, विकास महादेव मलमे, अविनाश महादेव माळी आणि लक्ष्मण बाळू शिंदे अशी या दहाजणांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी २५२ कोटी २८ लाख रुपयांचे १२६ किलो १४१ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, १५ लाख ८८ हजार रुपयांची कॅश, दिड लाखाचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दहा लाख रुपयांची एक स्कोडा कार असा २५२ कोटी ५५ लाख ३८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांनी सांगितले. या कटातील मुख्य सूत्रधार पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
१६ फेब्रुवारीला कुर्ला येथे एक महिला एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट सातचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने कुर्ला येथील चेंबूर-सांताक्रुज लिंक रोड, सयाजी पगारे चाळ, सीएसटी रोडवर साध्या वेशात पाळत ठेवून परवीनबानो शेख या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडून पोलिसांनी ६४१ ग्रॅम वजनाचे एमडी आणि ड्रग्ज विक्रीतून आलेली १२ लाख २० हजार रुपयांची कॅश, दिड लाखांचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला होता. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तिला नंतर पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत परवीनला किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीत असताना परवीनबानोची पोलिसाकडून कसून चौकशी करण्यात आली होती. यावेळी तिने तिला ते ड्रग्ज मिरारोड येथे राहणार्या साजिद मोहम्मद शेख याने दिल्याचे तसेच एमडी ड्रग्ज विक्री करणारी ही सराईत टोळी असल्याचे उघडकीस आले होते.
तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या पथकातील घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, शिंदे, महिला पोलीस निरीक्षक बाळगी, पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, रहाणे, तावडे, स्वप्निल काळे, शेलार, परबळकर, सहाययक पोलीस निरीक्षक बिराजदार, महिला फौजदार धुमाळ, नाईक, सहाय्यक फौजदार सावंत, उबाळे, पोलीस हवालदार पवार, धुमाळ, कदम, गुरब, शिंदे, बडगुजर, मोरे, सावंत, कांबळे, बल्लाळ, शेख, शिरापुारी, पांडे, गलांडे, जाघव, भोई, महिला पोलीस हवालदार तिरोडकर, पोलीस नाईक राऊत, पोलीस शिपाई शिंदे, राठोड, सय्यद होनमाने, सावंत, पाटील, महिला पोलीस शिपाई शेख, जाघव यांनी तपास सुरु केला होता. या पथकाने मिरारोड येथून साजिदला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी ३ लाख ६८ हजाराची कॅश आणि सहा कोटीचे तीन किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी गुजरातच्या सुरत शहरातून इजाअली अन्सारी आणि आदित्य बोहरा या दोघांना अटक केली.
या सर्व आरोपींच्या चौकशीतून सांगली येथे एमडी ड्रग्ज बनविण्याचा एक कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या पथकाने महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका एमडी ड्रग्ज बनविणार्या कारखान्यात कारवाई केली होती. २५ मार्चला केलेल्या या कारवाईत पोलिसांनी कारखान्यात २४५ कोटी रुपयांचा १२२ किलो ५०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याच कारवाईत पोलिसांनी प्रविण शिंदे, वासुदेव जाधव, प्रसाद मोहिते, विकास मुलमे, अविनाश माळी आणि लक्ष्मण शिंदे या सहाजणांना अटक केली होती. अटकेनंतर या सहाजणांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी एका टिपवरुन परवीनबानोला अटक करुन तिच्यासह नऊ सहकार्यांना अटक करुन सांगलीत सुरु असलेल्या एका एमडी ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त केला होता.
पोलीस तपासात त्यांनी सहा महिन्यांपूर्वी सांगली येथे ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता. या कारखान्यात बनविलेला एमडी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरात विक्री केला जात होता. यातील काही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही ड्रग्जसहीत इतर गुन्ह्यांत अटकेची कारवाई झाली होती. जेलमध्ये असताना त्यांची चांगली मैत्री झाली आणि त्यांनी पुन्हा एमडी ड्रग्जची विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याची योजना बनविली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगली येथे एक कारखाना सुरु केला होता. ही टोळी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी परवीनबानोचा वापर करत होती. महिलांवर शक्यतो कोणीही संशय घेत नसल्याने प्रत्येक डिलसाठी तिला पाठविले जात होते. त्यासाठी तिला चांगले कमिशन मिळत होते. दहा आरोपींच्या अटकेनंतर या कटातील मुख्य आरोपींनी पलायन केले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांनी सांगितले.