मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील एका दुकलीस एमएचबी पोलिसांनी अटक केली. अजय तुकाराम बोराडे आणि सुचित दिलीप जाधव अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून चोरीची सोनसाखळी आणि गुन्ह्यांत वापरलेली बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
रश्मी रविंद्र नलावडे ही ५० वर्षांची महिला बोरिवलीतील आयसी कॉलनीत राहते. मंगळवारी २६ मार्चला सायकाळी सात वाजता ती तिच्या घरातून तिच्या आईला भेटण्यासाठी जात होती. बोरिवलीतील आयसी चर्च ते सेंंट फ्रॉन्सिस स्कूलदरम्यान बाईकवरुन आलेल्या दोन तरुणांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते. तिने आरडाओरड करुन त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोघेही बाईकवरुन सुसाट वेगाने पळून गेले होते. या घटनेनंतर तिने एमएचबी पोलिसांत सोनसाखळी चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील २० ते २५ हून अधिक सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता.
या फुटेजसह मिळालेल्या माहितीवरुन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरडे, वसीम शेख, पोलीस हवालदार अनिल शिंदे, श्रीधर खोत, संदीप परीट, सतीश देवकर, पोलीस शिपाई अर्जुन आहेर, महांतेश सवळी, गणेश शरमाळे, योगेश मोरे यांनी बोरिवलीतील काजूपाडा परिसरातून अजय बोराडे आणि सुचित जाधव या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या दोघांनीही ही सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. या दोघांकडून पोलिसांनी चोरीची सोनसाखळीसह गुन्ह्यांत वापरलेली बाईक जप्त केली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.