जे. जे मार्ग आणि महालक्ष्मी येथे वांद्रे एएनसीची कारवाई
ड्रग्ज तस्करीप्रकरणी चौघांना अटक; सहा कोटीचे एमडी ड्रग्ज जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – सांगली येथील एमडी ड्रग्जचा कारखाना गुन्हे शाखेने उद्धवस्त केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या वांद्रे युनिटने जे. जे मार्ग आणि महालक्ष्मी येथे कारवाई करुन एमडी ड्रग्ज तस्करी करणार्या एका टोळीचा पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सहा कोटीचे एमडी ड्रग्जसहीत सात मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. या आरोपींच्या चौकशीतून त्यांच्या इतर सहकार्याचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एमडी ड्रग्ज तस्करी ही आंतरराज्य टोळी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
गेल्या काही वर्षांत एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना जे. जे मार्ग पोलीस ठाण्यात हद्दीत मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भोये, श्रीकांत कारकर, दादा गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक फाळके, पोलीस हवालदार देसाई, तळपे, मांढरे, महाडेश्वर, महिला पोलीस हवालदार आव्हाड, पोलीस शिपाई सौंदाणे, मोहिते, राठोड, काळे, निमगिरे, भोर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून गस्त सुरु ठेवली होती. ही गस्त सुरु असताना पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एमडी ड्रग्ज सापडले होते. चौकशीदरम्यान त्यांना ते ड्रग्ज महालक्ष्मी येथे राहणार्या त्यांच्या दोन सहकार्यांनी दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने महालक्ष्मी येथून त्यांच्या इतर दोन सहकार्यांना अटक केली.
या दोन्ही कारवाईत पोलिसांनी तीन किलो एमडी ड्रग्ज आणि सात मोबाईल जप्त केले होते. त्याची किंमत सुमारे सहा कोटी रुपये इतकी आहे. या चौघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. रात्री उशिरा याच गुन्ह्यांत चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना गुरुवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
२०२३ साली मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी ड्रग्ज तस्करीच्या १०६ हून अधिक गुन्ह्यांची नोंद केली असून या गुन्ह्यांत २२९ आरोपींना अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी ५३ कोटी २३ लाख रुपयांचा विविध ड्रग्जचा साठा जप्त केला होता. २०२४ साली २० गुन्ह्यांत ४७ ड्रग्ज तस्करांना अटक केली. या तस्करांकडून पोलिसांनी २९ कोटी ८६ लाख ५७ हजार रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.