कनिष्ठ टेक्निशियन-पर्यवेक्षक पदाच्या परिक्षेत डमी उमेदवार
बिहारच्या संबधित सात मुन्नाभाईंविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 जून 2025
मुंबई, – कनिष्ठ टेक्निशियन आणि पर्यवेक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत काही उमेदवारांनी डमी उमेदवारांना परिक्षा देण्यासाठी पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिहारच्या संबंधित सात मुन्नाभाईंविरुद्ध पवई पोलिसांत भादवीसह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या परिक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी रंजनकुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीव सिंग, संदीप कुमार आणि आशुतोष कुमार अशी या सात आरोपी मुन्नाभाई आरोपींची नावे असून ते सर्वजण बिहारच्या नालंदाचे रहिवाशी आहेत. आरोपींच्या अटकेसाठी पवई पोलिसांची एक टिम लवकरच बिहारला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही घटना 13 मार्च 2022 आणि 14 मार्च 2023 या दोन दिवशी पवईतील हॉटेल रमाडाजवळील मोरारजी नगर, आयटी पार्कच्या आयओएन डिजीटल झोन परिक्षा केंद्रात घडली होती. 1928 साली नाशिक येथे करन्सी नोट प्रेस सुरु करण्यात आली होती. ही प्रेस भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मालकीची एक मुद्रणालय आहे. या प्रेसमध्ये भारतीय चलनातील नोटांची छपाई होते. या नोटांसह पोस्टल स्टेशनरी आणि स्टॅम्पची तिथे छपाई होते. 1962 साली ही प्रेस दुसरीकडे स्थालांरीत करण्यात आले होते. त्यानंतर तिथे एक रुपयांची नोट आणि नंतर दहा हजाराच्या नोटांची छपाई सुरु करण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी या करन्सी प्रेससाठी कनिष्ठ टेक्निशियन आणि पर्यवेक्षक पदासाठी परिक्षा भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्यात मुंबईसह देशभरातून अनेक उमेदवारांनी अर्ज केला होता.
या अर्जानंतर 13 मार्च 2022 आणि 14 मार्च 2023 या दिवशी पवईतील आयटी पार्कच्या आयओएन डिजीटन झोनमध्ये संबंधित उमेदवारांची परिक्षा घेण्यात आली होती. त्यात रवी रंजनकुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीव सिंग, संदीप कुमार आणि आशुतोष कुमार या बिहारच्या सात उमेदवारांचा समावेश होता. या सातजणांनी परिक्षेत गैरप्रकार करुन स्वतऐवजी दुसर्या व्यक्तींना परिक्षा देण्यासाठी पाठविले होते. या डमी उमेदवारांनी त्यांच्या वतीने परिक्षा देऊन त्यात ते सर्वजण उत्तीर्णही झाले होते. त्यानंतर सात उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यात त्यांनी बोगस आयटीआय संस्थेसह डिप्लोमा इलेक्ट्रीकचे प्रमाणपत्र सार केले होते. या प्रमाणपत्रानंतर त्यांना करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरी मिळाली होती.
अलीकडेच हा प्रकार काही अधिकार्यांच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानंतर त्यांनी संबंधित सातही उमेदवारांबाबत चौकशी सुरु केली होती. त्यांनी सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांची तसेच परिक्षा केंद्रात परिक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या चौकशीत त्यांनी परिक्षेसाठी डमी उमेदवारांना पाठवून ही परिक्षा पास करुन घेतली होती. हा प्रकार उघडकीस येताच विक्रमसिंग सूर्यकांत चौधरी यांनी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सातही डमी मुन्नाईविरुद्ध उपनगर पोलिसांनी 120 (बी), 420, 465, 467, 468, 471, 34 भादवी सहकलम 7, 9 महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणार्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा पुढील तपास पवई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचे सर्व कागदपत्रे पवई पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पवई पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. त्यामुळे पवई पोलिसांचे विशेष पथक लवकरच बिहारच्या नालंदा येथे जाणार आहे. दोषी सातही उमेदवारांची चौकशी करुन त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.