मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 जून 2025
मुंबई, – अंधेरी परिसरात ड्रग्जसहीत एका विदेशी महिलेस वर्सोवा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. येना ख्रिस्तीना इडोवा असे या 34 वर्षीय आरोपी महिलेचे नाव असून ती नायजेरीयन नागरिक आहे. तिच्याकडून पोलिसांनी 418 ग्रॅम वजनाचे तीस कोकेन कॅप्सुल हस्तगत केले असून त्याची किंमत 1 कोटी 42 लाख रुपये असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले. येनाविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत ड्रग्ज तस्करीसह खरेदी-विक्रीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून स्थानिक पोलिसांना देण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. रविवारी रात्री वर्सोवा पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. ही गस्त सुरु असताना अंधेरीतील ओल्ड म्हाडा परिसरात काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दडिया, शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ढोले, पोलीस उपनिरीक्षक उगले, जाधव, पोलीस अंमलदार सोनार, ट्रॉम्बे, जाधव, परदेशी, कांबळे, वावरे यांनी ओल्ड म्हाडा परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
रात्री उशिरा तीन वाजता तिथे एक महिला संशयास्पदरीत्या फिरत होती. तिच्यावर संशय आल्याने तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या अंगझडतीत पोलिसांना 418 ग्रॅम वजनाचे कोकेन कॅप्सुल सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेन कॅप्सुलची किंमत 1 कोटी 42 लाख रुपये इतकी आहे. हा साठा जप्त करुन तिला पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तपासात तिचे नाव येना इडोवा असल्याचे उघडकीस आले. ती मूळची नायजेरीयन नागरिक असून सध्या दिल्लनीतील ओनडो नायजेरीया, हुसैन वजडीवाला चाळीत राहते. काही दिवसांपूर्वी ती मुंबई शहरात आली होती.
एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तिला ते कोकेन कॅप्सुल कोणी दिले, ते कॅप्सुल ती कोणाला देण्यासाठी आली होती, तिने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर सोमवारी दुपारी तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.