पत्नीसोबत चालवत होता मालवणीत बेकायदेशीर क्लिनिक

हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या बोगस डॉक्टरला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – गेल्या वर्षी मुलुंड पोलिसांनी दाखल केलेल्या एका हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेला एक बोगस डॉक्टर त्याच्या पत्नीसोबत मालाडच्या मालवणी परिसरात बेकायदेशीर क्लिनिक चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस येताच गुन्हे शाखेच्या युनिट बाराच्या अधिकार्‍यानी मालवणीतील एका पॉलिक्लिनिकमध्ये छापा टाकून परवेज अब्दुल अजीज शेख या बोगस डॉक्टरला बेड्या ठोकल्या. त्याला पुढील चौकशीसाठी मालवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. परवेज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध कापूरबावडी, मालवणी आणि मुलुंड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह खंडणी, हत्येच्या चार गुन्ह्यांची नोंद असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले.

गेल्या वर्षी मुलुंड पोलीस ठाण्यात कट रचून हत्या करणे, बोगस दस्तावेज बनविणे या भादवीसह महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीशनर्स कायदा कलमांतर्गत एका गुन्ह्यांची नोंद केली होती. याच गुन्ह्यांत परवेज शेख हा वॉण्टेड आरोपी होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असतानाच मालाडच्या मालवणी परिसरात परवेजने त्याच्या पत्नीसोबत अजीज पॉलिक्लिनिक नावाचा एक दवाखाना सुरु आहे. या क्लिनिकमध्ये तो रुग्णांवर उपचार करुन त्यांच्याकडून फी म्हणून जास्त रक्कम घेत असल्याची माहिती युनिट बाराच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट बाराचे प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, विशाल मोहिते, महिला पोलीस उपनिरीक्षक निलोफर शेख, पोलीस हवालदार शैलेश बिवकर, विशाल गोमे, प्रसाद गोरुले, शैलेश सोनावणे, पोलीस शिपाई चंद्रकांत शिरसाठ, सहाय्यक फौजदार कैलास सावंत यांनी अजीज पॉलिक्लिनिकमध्ये छापा टाकला होता. यावेळी क्लिनिकमध्ये पाचजण बसले होते. त्यापैकी एका वयोवृद्धाला परवेज हा इंजेक्शन देत होता. त्यामुळे त्याच्याकडे पोलिसांनी त्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली. त्याने त्याच्याकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे सांगून तो बोगस डॉक्टर असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर घटनास्थळाहून पोलिसांनी काही औषधांचा साठा आणि इतर साहित्य जप्त केले.

तपासात परवेजने २०१४ साली सांताक्रुज येथील महाविद्यालयातून बीयूएमएसची पदवी घेतली होती. तो एका डॉक्टरकडे सहाय्यक म्हणून काम करत होता. तिथे त्याने विविध आजारावर कुठले औषध द्यायचे याची माहिती जाणून घेतले होते. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याला या कामात त्याची पत्नी मदत करत होती. गेल्या दोन वर्षांपासून तो मालवणी परिसरात पॉलिक्लिनिक चालवत होता. त्याच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यांत तो वॉण्टेड आरोपी आहे. कापूरबावडी, मालवणी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह खंडणीचे तीन गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मालवणी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. यावेळी त्याच्या पत्नीला नोटीस देऊन चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page