बारच्या आवारात पोलीस हवालदाराला लाथ्याबुक्यांनी मारहाण

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 जून 2025
मुंबई, – मद्यप्राशन करुन बारमध्ये गोंधळ घालणार्‍या एका तरुणाने बारच्या आवारातच एका पोलीस हवालदाराला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी अंधेरी परिसरात घडली. या मारहाणीत पोलीस हवालदार हनुमंत माळाप्पा पुजारी यांना गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राज दिनाकरण मुथ्थू या 28 वर्षांच्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हनुमंत पुजारी हे वी मुंबईतील तळोजा परिसरात राहत असून सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी त्यांची नाईक शिफ्ट होती, त्यामुळे ते रात्री आठ वाजता पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यांच्यावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बार अ‍ॅण्ड रेस्ट्रॉरंट तपासणीची ड्यूटी सोपविण्यात आली होती. यावेळी त्यांयासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पालव, पोलीस शिपाई जाधव आदी पथक होते. शनिवारी पहाटे चार वाजता अंधेरीतील मरोळ, टाईम स्क्वेअर इमारतीमध्ये टॅप रेस्ट्रो बारमध्ये दहा ते पंधरा ग्राहक असून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु आहे. त्यामुळे पोलीस मदतीची गरज आहे असा कॉल कंट्रोल रुममधून पोलिसांना मिळाला होता.

या कॉलनंतर संबंधित पोलीस पथक तिथे गेले होते. यावेळी या ग्राहकांना शांत करुन पोलीस व्हॅनमध्ये बसण्यास सांगण्यात आले. यावेळी राज मुथ्थू नावाच्या एका तरुणाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात करुन पोलीस व्हॅनमध्ये बसणार नाही असे सांगितले. त्यानंतर त्याने पोलिसांना शिवीगाळ करुन हनुमंत पुजारी यांना लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात त्यांना दुखापत झाली होती. हा प्रकार लक्षात येताच इतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. जखमी झालेल्या हनुमंत पुजारी यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राज मुथ्थूविरुद्ध कर्तव्य बजाविणार्‍या पोलिसांशी हुज्जत घालणे, शिवीगाळ करुन पोलीस हवालदाराला बेदम मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात राज हा दहिसर येथील नवागाव, राजाराम चाळीत राहत असून खाजगी कंपनीत कामाला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page