अपहरणासह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक
तीन वर्षांपासून विविध राज्यात 60 सिमकार्ड बदलून राहत होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 जून 2025
मुंबई, – कुर्ला येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस अखेर विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली. नौशाद इसरार अहमद असे या 22 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच नौशाद हा गेल्या तीन वर्षांपासून विविध राज्यात लपून राहत होता, अटकेच्या भीतीने त्याने आतापर्यंत साठहून अधिक सिमकार्ड बदलल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तरीही त्याला तीन वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
18 जुलै 2022 रोजी नौशादविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला होता. त्यात त्याच्यावर एका अल्पयीन मुलीचे अपहरण करुन तिचा विनयभंग तसेच लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप होता. मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून सतत शोध घेतला जात होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता. या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी गंभीर दखल घेत विनोबा भावे नगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सोनावणे, पोलीस हवालदार पवार, राजेश पंचरास, रामचंद्र पाटील, खेमू राठोड, पोलीस शिपाई गोरख पवार, रामदास निळे, प्रितम मेढे यांनी पुन्हा त्याचा नव्याने शोध घेण्यास सुरुवात केली होती. तपासादरम्यान नौशाद गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश स्वतचे अस्तित्व व नाव बदलून राहत होता. अटकेच्या भीतीने त्याने साठहून अधिक सिमकार्ड बदलली होती. तरीही पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन त्याचा शोध सुरु ठेवला होता.
याच दरम्यान नौशाद हा गुजरात येथील सेफ एक्सप्रेस कुरिअर गोदामात चालक म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. त्याची माहिती काढताना त्याला पदमला परिसरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच नौशाद असल्याचे उघडकीस आले होते. त्याला अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.