त्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचे उघड
अल्पवयीन मित्रानेच 32 व्या मजल्यावरुन धक्का दिला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 जुलै 2025
मुंबई, – गेल्या आठवड्यात भांडुप येथे एका सोळा वर्षांच्या मुलीने निवासी इमारतीच्या 32 व्या मजल्यावरुन आत्महत्या केल्याची पोलिसांत नोंद झाली होती. मात्र या मुलीने आत्महत्या केली नसून तिच्या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मित्राने तिला तिसाव्या मजल्यावरुन धक्का दिल्याची धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे. प्रपोज केल्यानंतर मुलीकडून नकार येताच रागाच्या भरात त्याने तिला धक्का दिल्याने तिचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला. त्यामुळे आरोपी मित्राविरुद्ध भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
24 जूनला सायंकाळी पावणेआठ वाजता भांडुपच्या महिंद्रा स्पलेंडर इमारतीवरुन एक अल्पवयीन मुलगी पडल्याची माहिती भांडुप पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले होते. तिने इमारतीच्या 32 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. इमारतीचे सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर ही मुलगी सव्वासहा वाजता एका मुलासोबत इमारतीमध्ये प्रवेश करताना दिसून आली. त्यामुळे या मुलाची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती.
चौकशीदरम्यान तो तिचा मित्र होता. ते दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांच्या परिचित होते. गुन्ह्यांच्या दिवशी ती त्याला भेटण्यासाठी तिथे आली होती. मात्र त्याने तिला घरी न नेता इमारतीच्या 32 व्या मजल्यावरील टेरेसवर आणले होते. मात्र तो सांगत असलेली माहिती विसंगत वाटत असल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरु केली होती. त्याला विविध प्रश्न विचारुन सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने मृत मुलीने त्याला परिक्षेत कमी मिळाल्याने तसेच शाळेत तिला सतत चिडवत असल्याने तिने नाराजी व्यक्त केली होती. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज करुन डेटींगची ऑफर दिली होती.
मात्र तिने त्याची ऑफर धुडकावून लावली होती. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिला जोरात धक्का दिला होता. त्यामुळे ती टेरेसवरुन खाली पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तो प्रचंड घाबरला, त्याने तिचा मोबाईल दुसरीकडे फेंकून तेथून पळ काढला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांच्या तक्रारीवरुन भांडुप पोलिसांनी अल्पवयीन मित्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
तो सोळा वर्षांचा असल्याने त्याला ताब्यात घेऊन नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. या मुलीने आत्महत्या केली नसून तिची तिच्याच मित्राने हत्या केल्याचे उघडकीस आल्याने स्थानिक रहिवाशांना प्रचंड धक्का बसला होता.