अंधेरीतील ब्ल्यू मून स्पामधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

स्पाच्या मालकाला अटक तर चार तरुणींची सुटका

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 जुलै 2025
मुंबई, – साकिनाका येथील सॉलिस्टिक स्कॉय स्पामधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अंधेरीतील अन्य स्पामध्ये मसाजसह इतर सर्व्हिसच्या नावाने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ब्ल्यू मून या स्पामधील कारवाईत पोलिसांनी रुकाया अनिस अहमद शेख या मालकाला अटक केली तर चार तरुणींची सुटका केली. अटकेनंतर रुकाया शेखला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यशस्वी संजय सिंग आणि विशाल लक्ष्मी मुंडा या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गेल्याच आठवड्यात साकिनाका परिसरातील सॉलिस्टिक स्कॉय या स्पामध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. ही कारवाई सुरु असताना अंधेरील गावदेवी मरोळ, इंडो सायागाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या ब्लू मुन या स्पामध्ये अशाच प्रकारे तिथे कामाला असलेल्या तरुणींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने स्पामधील सेक्स रॅकेटची शहानिशा केली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळताच गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता एमआयडीसी पोलिसांच्या एका विशेष पथकाने छापा टाकला होता.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली होती. या तरुणींच्या चौकशीतून तिथे मसाजसह इतर सर्व्हिसच्या मदतीने स्पाचे मालक, मॅनेजर त्यांना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याचे उघडकीस आले होते. ग्राहकांकडून मिळणार्‍या रक्कमेतून काही रक्कम त्यांना तर उर्वरित मालक, मॅनेजर स्वतकडे ठेवत होते. या माहितीनंतर पोलिसांनी स्पाचे मालक रुकाया शेख, यशस्वी सिंग आणि विशाल मुंडा या तिघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यांत रुकाया शेखला नंतर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. स्पामधून सुटका केलेल्या चारही बळीत तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत यशस्वी सिंग आणि विशाल मुंडा यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page