विद्यार्थ्यांवर लैगिंक अत्याचारप्रकरणी शिक्षिकेच्या कोठडीत वाढ
शाळा प्रशासनाकडून शिक्षिकेवर लवकरच कारवाईचे संकेत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जुलै 2025
मुंबई, – दादर येथे एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर त्याच्याच शिक्षिकेने लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने शाळेतील शिक्षकासह पालक आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षिकेला दादर पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीत असलेल्या या शिक्षिकेच्या कोठडीत बुधवारी एक दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेची शाळा प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोपी शिक्षिकेवर लवकरच कारवाईचे संकेत दिल्याचे बोलले जाते.
पिडीत मुलगा सोळा वर्षांचा असून तो एका नामांकित शाळेत शिकत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर शाळेच्या शिक्षिकेकडून लैगिंक अत्याचार सुरु होता. ही शिक्षिका त्याला पॉश हॉटेलमध्ये नेत होती, तिथे त्याला मद्यप्राशन करण्यास तसेच लैगिक अत्याचारास प्रवृत्त केले जात होते. जानेवारी 2024 रोजी तिने त्याच्यावर पहिल्यांदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर तिच्याकडून त्याच्यावर सतत गैरवर्तन सुरु होते.शिक्षिकेकडून होणार्या अत्याचाराला कंटाळून त्याने त्याच्या पालकांना ही माहिती दिली होती. दहावीची परिक्षा होणार असल्याने त्याच्या पालकांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र परिक्षा संपल्यानंतरही शिक्षिकेने त्याचा मानसिक व शारीरिक शोषण सुरुच ठेवले होते, त्यामुळे त्याच्या पालकांनी दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी शिक्षिकेविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून मोबाईल फॉन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. या मुलावर लैगिंक अत्याचार झालेल्या जागेची लवकरच पोलिसांकडून पाहणी केली असून पुरावे गोळा करण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान अटकेनंतर तिला विशेष सत्र न्यायालयाने 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तिच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ केली आहे.