मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जुलै 2025
मुंबई, – गोरेगाव येथील वासरी हिल पुर्नविकास इमारतीमध्ये फ्लॅटसह दुकानासाठी घेतलेल्या सुमारे 34 लाखांचा अपहार करुन एका महिलेची फसवणुक झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विकासकासह दोघांविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हिरेन अश्विन शहा आणि व्यकंटेश ऊर्फ रविकुमार गौडा अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गीता विजय झगडे ही महिला विरार येथे राहते. तिचे पती विजय झगडे हे अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. मालाडच्या एकतानगर परिसरात तिच्या मालकीचा एक फ्लॅट होता. त्यावेळेस तिथे रविकुमार भाड्याने राहत होता. त्यातून त्यांच्यात चांगली ओळख झाली होती. 2015 साली रविकुमारने तिला गोरेगाव येथे चेतक कंन्स्टक्शन कंपनीकडून एका पुर्नविकास इमारतीचे बांधकाम सुरु असून याच इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅटसह दुकान देण्याचे आश्वासन दिले होते. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिची कंपनीचे सीईटो दिलीप पंडितशी ओळख करुन दिली होती. यावेळी पंडितने तिला वासरी हिल या पुर्नविकास इमारतीमध्ये फ्लॅट उपलब्ध असून हा प्रकल्प हिरेश शहा यांच्याकडे केला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने संबंधित जागेची पाहणी केली होती.
पाहणीदरम्यान तिला आधी तिथे काही झोपड्या होत्या. या झोपड्या तोडून तिथे पुर्नविकास इमारतीचे काम सुरु होणार असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने तिथे एक फ्लॅट घेण्याचे ठरविले होते. चर्चेअंती त्यांच्यात 19 लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता. त्यामुळे तिने कंपनीच्या नावाने साडेतेरा लाखांचे पेमेंट करुन फ्लॅटचे बुकींग केले होते. त्यानंतर तिला 269 चौ फुटाचा फ्लॅटचे अॅलोटमेंट देण्यात आले. त्यात हिरेन शहाची स्वाक्षरी होती. त्यानंतर ती इमारतीच्या पुर्नविकासाबाबत सतत विचारणा करत होती. मात्र सीसी न मिळाल्याने पुढील प्रक्रिया थांबली होती. याच दरम्यान तिने वासरी हिल इमारतीमध्ये शंभर चौ. फुटाचा सुमारे 20 लाखांचा एक दुकान बुक केला होता. त्यासाठी तिने त्यांना दहा लाख धनादेश आणि अकरा लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. त्यानंतर तिला पुन्हा दुकानाचे अॅलोटमेंट देण्यातआले.
2017 साली वासरी हिल इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र तिला फ्लॅटसह दुकानाचा ताबा देण्यात आला नाही. सतत विचारणा करुनही हिरेन शहाकडून तिला उडवाउडवीचे उत्तरे दिली जात होती. काही दिरवसांनी हिरेन, रविकुमार, दिलीप यांनी त्यांना फ्लॅटसह दुकानाचा ताबा देणार नाही. पुन्हा पुन्हा विचारणा केल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. नंतर त्यांनी तिचे कॉल घेणे बंद केले होते.
2015 ते 2025 या कालावधीत 34 लाख 50 हजार रुपये घेऊन आरोपींनी तिला तिच्या मालकीच्या फ्लॅटसह दुकानाचा ताबा दिला नाही, उलट विचारणा केल्यानंतर तिला धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हिरेन शहा आणि रविकुमार गौडा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.