वडिलांच्या निधनानंतर निवृत्तीवेतनाचा अपहार करुन फसवणुक
एटीएममधून पैसे काढणार्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जुलै 2025
मुंबई, – जीपीओमध्ये सीटीओ म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकार्याच्या निधनानंतर त्यांच्या निवृत्तीवेतनाचा त्यांच्याच मुलाने अपहार करुन जीपीओ कार्यालयाची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. निमेशभाई कभाई बेलदार असे या आरोपीचे नाव असून तो गुजरातच्य गांधीनगर, पेठापूरचा ररहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबईतील रहिवाशी विठ्ठल गोविंदराव पल्लेवाड हे जीपीओमध्ये उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोस्ट खात्यातील आर्थिक गैरव्यवहारासह व्यवहारातील अनियमता निदर्शनास आल्यानंतर त्याची चौकशी करुन वरिष्ठांना सादर करणे, वरिष्ठांच्या आदेशावरुन स्थानिक पोलिसांत तक्रार करणे आदींची त्यांच्यावर जबाबदारी आहेत. त्यांच्या जीपीओच्या वरिष्ठ अधिक्षक कार्यालयात कभाई भाईलाल बेलदार हे सीटीओ म्हणून कार्यरत होते. जीपीओमध्ये बरीच वर्ष सेवा केल्यानंतर ते 2007 साली निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना जीपीओकडून नियमानुसार केंद्र सरकारच्या वतीने निवृत्तीवेतन देण्यात येत होते.
कभाई बेलदार हे गुजरातच्या गांधीनगर, पेठापूर, सुरेला गावचे रहिवाशी होते. पत्नी जयाबेन, तीन मुले निमेशभाई, निताबेन आणि हिराबेन असा त्यांचा परिवार होता. डिसेंबर 2018 साली कभाई यांचे निधन झाले तर त्यापूर्वी सप्टेंबर 2017 रोजी त्यांची पत्नी जयाबेन हिचे निधन झाले होते. कभाई यांच्या निधनानंतर ही माहिती जीपीओ कार्यालयात कळविणे तसेच त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र सादर करणे त्यांच्या मुलांची जबाबदारी होती, मात्र त्यांचा मुलगा निमेशभाई याने ही माहिती जीपीओ कार्यालयात सांगितली नव्हती. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या निवृत्तीवेतन त्यांच्या बँक खात्यात जमा होत होते.
ऑक्टोंबर 2020 रोजी त्यांच्या जावई दिलीप बेलदार याने कभाई बेलदार यांचे निधन झाल्याचे सांगून त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जीपीओमध्ये सादर केले होते. त्यामुळे त्यांच्या बॅक खात्यात जमा झालेल्या निवृत्तीवेतन रक्कमेबाबत चौकशी सुरु करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान त्यांचा मुलगा निमेशभाई याने निवृत्तीवेतनाची 3 लाख 11 लाख 988 हजाराची रक्कम परस्पर एटीएममधून काढल्याचे उघडकीस आले होते. नोव्हेंबर 2019 रोजी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात आले नाही म्हणून त्यांची पेंशन थांबविण्यात आली होती. त्यांच्या मालकीचे जुने घर परस्पर विक्री करुन निमेशभाई निघून गेला होता.
निवृत्तीवेतनाची रक्कम वसुलीसाठी जीपीओकडून सतत पाठपुरावा करण्यात येत होता, मात्र निमेशभाईकडून संबंधित विभागाला काही प्रतिसाद मिळाला नाही. अशा प्रकारे कभाई बेलदार यांच्या निधनाची माहिती जीपीओला न कळविता त्यांच्या पेंशनच्या रक्कमेचा त्यांचा मुलगा निमेशभाई बेलदार याने अपहार करुन जीपीओ कार्यालयाची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच वरिष्ठांच्या आदेशावरुन विठ्ठल पल्लेवाड यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निमेशभाई बेलदार याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.