मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जुलै 2025
मुंबई, – अंधेरीतून अपहरण केलेल्या पान मालकाचे अपहरण करुन त्याच्याकडून दोन पोलिसांसह चौघांकडून चाळीस हजाराची खंडणी वसुली झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पान मालकाच्या तक्रारीवरुन चारही आरोपीविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी अपहरणासह खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत हेमंत कृष्णा कापसे, चंद्रशेखर दरांडे, नितीन गाढवे आणि सागर वाघ या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यातील हेमंत कापसे आणि चंद्रशेखर दरांडे पोलीस कर्मचारी, नितीन गाढवे हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा जवान तर नितिन गाढवे हा खाजगी व्यक्ती असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर चारही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने जामिनावर सोडून दिले आहेत.
मोहम्मद आरिफ फैजान खान हे अंधेरीतील रहिवाशी असून अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ त्यांचा पान मसाला विक्रीचे दुकान आहे. 24 जूनला सायंकाळी पावणेपाच वाजता त्यांच्या दुकानाजवळ चारजण आले आणि त्यांनी गुटखा विक्री केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाईची धमकी देऊन त्यांना एका एर्टिगा कारमध्ये बसविले. ही कार नंतर दक्षिण मुंबईच्या दिशेने निघाली. एफडीएचे अधिकारी असल्याची बतावणी करुन कारमध्येच आरिफ खान यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण करण्यात आली. गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे तीन लाखांची मागणी केली होती. मात्र तीन लाख रुपये नसल्याने त्यांनी त्यांच्याकडून दहा हजार रुपये ऑनलाईन घेतले होते. तसेच त्यांच्याकडील साडेतीन हजार स्वतकडे ठेवले होते. पैशांसाठी आरिफ खान यांनी मित्रांची मदत मागितली होती.
अखेर मित्रांनी पाठविलेले तीस हजार रुपये त्यांनी ऑनलाईन संबंधितांना दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर या चौघांनी त्यांना सत्तर रुपये देऊन डॉकयार्ड रोडवर सोडले. दुसर्या दिवशी घडलेला प्रकार आरिफ खान यांनी डी. एन नगर पोलिसांना सांगून संबंधित चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी अपहरणासह खंडणी, धमकी देणे आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच काही तासांत हेमंत कापसे, चंद्रशेखर दरांडे, नितीन गाढवे आणि सागर वाघ या चौघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनीच आरिफ खान यांचे अपहरण करुन त्यांच्याकडून 43 हजार 500 रुपयांची खंडणी वसुली केल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस येताच या चौघांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. त्यांनतर त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन चारही आरोपींची नंतर कोर्टाने जामिनावर सुटका केली.
तपासात हेमंत कापसे आणि चंद्रशेखर दरांडे हे दोघेही पोलीस कर्मचारी असून विशेष शाखेत कार्यरत आहेत. यातील हेमंत कापसे यांना यापूर्वीही पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यावेळेस ते शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काही वर्षानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्यावर दुसर्यांदा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या संपूर्ण घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम यांनी गंभीर दखल घेत त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.