मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जुलै 2025
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका 77 वर्षीय व्यापार्याची 1 कोटी 37 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन आरोपींना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अली रेहमान खान आणि अहमद मुश्ताक सखियानी अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम जमा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
77 वर्षांचे तक्रारदार राजागोपाळ निलकंठन हे मालाडच्या एव्हरशाईन ग्रॅण्ड्यूर सहकारी सोसायटीमध्ये राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय होता. सध्या त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली असून घरी असतात. मे महिन्यांत घरी असताना त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भातील माहिती दिली होती. ग्रुपमधील अनेक सभासद शेअरची माहिती घेत त्यात गुंतवणुक करत होते, या गुंतवणुकीवर त्यांना परवाता मिळत असल्याचे सांगत होते. काही दिवसांनी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना संपर्क साधून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी स्वतचे नाव, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील व इतर माहिती अपलोड केली होती.
गुंतवणुकीवर 300 टक्के परतावा मिळत असल्याने 5 मे ते 21 जून या कालावधीत त्यांनी विविध शेअरमध्ये 1 कोटी 37 लाखांची गुंतवणुक केली होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर प्रचंड फायदा झाल्याचे भासविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यापैकी काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ही काढता आली होती. त्यासाठी त्यांना दहा टक्के म्हणजे 70 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच राजागोपाळ निलकंठन यांनी उत्तर प्राादेशिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच या अधिकार्यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अली खान आणि अहमद सखियानी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांच्यात बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम जमा झाली होती. ही रक्कम त्यांनी गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांना ट्रान्स्फर केली होती. त्यामोबदल्यात त्यांना काही रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. सायबर ठगांसाठी ते दोघेही विविध बँकेत खाती उघडून त्याची माहिती संबंधित ठगांना देत होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.