मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जुलै 2025
मुंबई, – ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन विदेशी नागरिकांना एमआयडीसी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. चिदीबुबे नामदी इजे आणि प्रॉमिस एनडी ओनाना अशी या दोघांची नावे असून ते दोघेही नायजेरीयन नागरिक आहेत. या दोघांकडून पोलिसांनी कोकेन, एमडी आणि स्कूटी असा सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुधवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. अंधेरीतील महाकाली केव्हज रोड, गोणीनगर परिसरात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक यश पालवे व त्यांच्या सहकार्यांनी एका संशयित फिरणार्या नायजेरीयन नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील पिशवीची पाहणी केली असता त्यात या अधिकार्यांना एमडी ड्रग्ज सापडले. चौकशीदरम्यान त्याचे नाव चिदीबुबे नामदी इजे असल्याचे उघडकीस आले. तो पवईतील आयआयटी, चैतन्यनगर, अवधेश सोसायटीमध्ये राहत होता. त्याच्याकडून पोलिसांनी वीस ग्रॅम कोकेन आणि सोळा ग्रॅम एमडी ड्रग्जसहीत एक स्कूटी असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.
त्याच्या चौकशीनंतर त्याच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत त्याचा सहकारी मित्र प्रॉमिस एनडी ओनाना याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे या अधिकार्यांना दहा लाख रुपयांचे 67 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या दोघांविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तपासात ते दोघेही नायजेरीयन नागरिक असून गेल्या काही महिन्यांपासून पवई परिसरात राहत होते. झटपट पैशांसाठी ते दोघेही ड्रग्ज तस्करीत सक्रिय झाले होते.
अंधेरीतील गोणीनगर परिसरात चिदीबुबे हा कोकेन-एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आला होता, मात्र गस्त घालणार्या पोलिसांच्या सतर्कमुळे या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले, प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी यश पालवे, पोलीस उपनिरीक्षक महादेव जगताप, पोलीस हवालदार मंडले, पुजारी, नलावडे, पोलीस शिपाई जाधव, माळी, पवार, देसाई, जगताप यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.