मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जुलै 2025
मुंबई, – अनैतिक संबंधाच्या संशयावरुन शाहरुख नावाच्या एका तरुणावर तलवारीने वार करुन प्राणघातक हल्ला झाल्याची घटना वडाळा परिसरात घडली. या हल्ल्यात शाहरुख हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्याावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. या हल्ल्यानंतर जुनैद मुन्नू खान ऊर्फ चिना नावाच्या एका 24 वर्षीय आरोपीने वडाळा टी टी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करुन घडलेला प्रकार सांगितला. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी 2 जुलैला सायंकाळी साडेपाच वाजता वडाळा येथील हुसैन दर्गा, फाल्गुनी इमारतीजवळ घडली. जुनैद हा ठाण्यातील टिटवाळा परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. त्याच्या पत्नीचे शाहरुखसोबत अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून तो बुधवारी सायंकाळी वडाळा परिसरात आला होता. फाल्गुनी इमारतीजवळ त्याचे शाहरुखसोबत प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर त्याने त्याच्यावर तलवारीने वार केले होते. त्यात शाहरुख हा रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या गळ्यावर, चेहर्यावर आणि उजव्या हातावर गंभीर दुखापत झाली होती. यावेळी काही रहिवाशांनी जुनैदला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काही वेळानंतर जुनैद हा तेथून निघून गेला. यावेळी स्थानिक रहिवाशांनी रक्तबंबाळ झालेल्या शाहरुखला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दादापीर हुसैनसाब तलवाई या 66 वर्षांच्या वयोवृद्धाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जुनैदविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच दरम्यान तो स्वतहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.