घरफोडीच्या गुन्ह्यांतील तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक
दिडोंशी-बोरिवली आणि समतानगर पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जुलै 2025
मुंबई, – उत्तर उपनगरातील गोरेगाव ते बोरिवली परिसरात घरफोडी करणार्या तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. विजय राजेंद्र गुप्ता, रंजीतकुमार जयेंद्रकुमार सिंग ऊर्फ मुन्ना आणि यश राजेश चौधरी ऊर्फ मोगली अशी या तिघांची नावे आहेत. यातील विजय न्यायालयीन तर इतर दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. या तिघांच्या अटकेने तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या तिन्ही गुन्ह्यांत त्यांनी सुमारे तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पहिल्या गुुन्ह्यांतील तक्रारदार मौलिक ललितकुमार रुपारेलिया हे बोरिवली परिसरात राहतात. 21 मेला ते त्यांच्या कुटुंबियासोबत गुजरातच्या राजकोटला सुट्टीनिमित्त फिरायला गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वज्रधाम अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक बी/204 मध्ये प्रवेश करुन सुमारे पावणेआठ लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. त्यात 155 ग्रॅम वजनाच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. 31 मेला घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला होता. त्यानंतर त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रंजीतकुमार ऊर्फ मुन्ना या 44 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसर्या गुन्ह्यांत अभिषेक चिंतामणी मेस्त्री हे आयटी इंजिनिअर असून ते विरार येथे राहतात. 7 मार्चला त्यांच्या मालाड येथील के. एम माले फार्मासिटीकल लिमिटेड कंपनीत घरफोडी झाली होती. कंपनीच्या कार्यालयात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने कार्यालयातील ड्राव्हरमधील साडेतीन लाखांची कॅश चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी दिडोंशी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल होताच दोन दिवसांपूर्वी विजय गुप्ता या 27 वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली. रंजीतकुमार आणि विजय हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
तिसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार शन मुगवेल सेल्वजरात हे कांदिवलीतील अण्णानगर, सेल्वराज चाळीत राहत असून आंबिट बिल्डर अॅण्ड हेव्हल्पर्स या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करतात. 27 एप्रिल ते 20 मे 2025 या कालावधीत ते त्यांच्या कुटुंबियंसोबत त्यांच्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी तामिळनाडूच्या गावी गेले होते. यावेळी त्यांच्या घरी घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचे विविध दागिने आणि चांदीचे राखी असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. याच गुन्ह्यांत नंतर यश चौधरी ऊर्फ मोगली याला समतानगर पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने ही घरफोडी केल्याची कबुली दिली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या तिघांच्या अटकेने तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचा काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या आरोपींच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.