मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – शहरातील एका प्रतिष्ठित कंपनीच्या मालकासह संचालकांचे बोगस स्वाक्षरी घेऊन बोगस नावाने पेमेंट काढून महिला कर्मचार्याने तिच्याच पतीच्या मदतीने कंपनीत सुमारे ४१ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहार, फसवुणकीसह अन्य भादवीच्या विविध कलमातर्गत गुन्हा नोंद होताच या महिला कर्मचार्यासह तिच्या पतीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मेनका राकेश सिन्हा आणि आशिष अरविंद वाथरे अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रियांक विपीन शहा हे बोरिवलीतील शिंपोली रोड, रिलायन्स मॉलजवळील सत्रापार्क अपार्टमेंटमध्ये राहतात. ते एका खाजगी कंपनीत गेल्या पंधरा वर्षांपासून प्रोजेक्ट इंचार्ज म्हणून काम करतात. या कंपनीचे मालक संदीप मेहता असून त्यांच्यानंतर कंपनीचे सर्व अधिकारी आशिष जैन, सचिन मेहता यांच्यासह त्यांच्याकडे आहेत. या कंपन्यांना महानगपालिकेसह इतर शासकीय कंत्राटे मिळतात. संबंधित कंत्राटे पूर्ण केल्यानंतर त्यांना शासकीय विभागाकडून पेमेंट केले जात होते. कंपनीचे चर्चगेट, बोरिवली आणि गोरेगाव परिसरात तीन कार्यालय असून या तिन्ही कार्यालयातून प्रियांक शहा हे काम पाहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कंपनीला मनपाकडून विविध रस्त्याच्या सुधारण्याचे काम मिळाले होते. त्यामुळे ते या कामात प्रचंड व्यस्त होते. कंपनीच्या गोरेगाव येथील कार्यालयात मेनका सिन्हा ही गेल्या अडीच वर्षांपासून काम करत असून तिच्यावर अकाऊंट विभागाची जबाबदारी होती. कामगाराचे पगार, बिलासह मालाच्या बिलाची तपासणी करणे, पेटी कॅश पावती तपासणे आदी सर्व जबाबदारी तिच्याकडे होती. प्रत्येक कागदपत्रांवर संदीप मेहता यांची स्वाक्षरी घेतल्यानंतर ती फाईल शहानिशा करण्यासाठी तिच्याकडून बोरिवलीतील कार्यालयात पाठविली जात होती. या कागदपत्रांवर शेरा दिल्यानंतर पेमेंटसाठी ती फाईल पुन्हा गोरेगाव येथे पाठवून नंतर कामगारासह संबंधित कंपनीला पेमेंेट दिले जात होते.
१० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत त्यांनी चर्चगेट, बोरिवली आणि गोरेगाव कार्यालयातील काही रजिस्ट्ररची तपासणी केली होती. यावेळी त्यांना संदीप मेहता यांची स्वाक्षरी केल्यानंतर मेनकाने विविध धनादेशाद्वारे काही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केल्याचे दिसून आले होते. तपासअंती मेनकाने तिचे पती आशिष वाथरे याच्या मदतीने बोगस पावतीवर त्यांच्यासह संदीप मेहता आणि आशिष जैन यांची बोगस नावाने स्वाक्षरी करुन १२ सप्टेंबर २०२२ ते १५ जुलै २०२३ या कालावधीत कंपनीच्या सुमारे ४१ लाखांचा अपहार केला होता. ही रक्कम तिने तिचे पती आशिष वाथरे, त्याचे परिचित मित्र दिलीप शंकर देवळेकर आणि राजेश रमेश वाथरे यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. अशा प्रकारे तिने बोगस पावतीवर बोगस सही करुन बोगस नावाने पेमेंट काढून कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर प्रियांक शहा यांनी संदीप मेहतासह कंपनीच्या इतर संचालकाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या वतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात मेनका सिन्हासह तिचा पती आशिष वाथरे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच मेनका आणि आशिष या दोघांची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. या चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्यांना इतर कोणी मदत केली होती का याचा पोलीस तपास करत आहेत.