दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाचजणांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 जुलै 2025
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांशी हुज्जत घालून आरोपींनी धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याची घटना चुन्नाभट्टी आणि घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी घाटकोपर आणि चुन्नाभट्टी पोलिसांनी कर्तव्यावरील पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करुन पाच आरोपींना अटक केली आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
सुचेंद्र सुदाम शेटे हे चुन्नाभट्टी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. बुधवारी सायकाळी साडेसहा वाजता अक्षय गायकवाड याच्या वडिलांच्या तक्रारीवरुन दोषींवर कारवाई कररण्यास सुरुवात केली होती. त्याचा राग आल्याने अक्षय बापू गायकवाड, रुतिक बापू गायकवाड, बापू गायकवाड आणि आशा गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. अक्षयने स्वतकडील ब्लेडने स्वतवर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. पोलीस ठाण्यात शिवीगाळ करुन पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर सुचेंद्र शेटे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गायकवाड कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांंत नंतर चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना गुरुवारी 3 जुलैला दुपारी दोन वाजता घाटकोपर येथील नित्यानंदनगर, राम रहिम मित्र मंडळ, पीडब्ल्यूडी गोदामाजवळ घडली. रविंद्र ज्ञानेश्वर मोरे हे दिवा परिसरात राहत असून घाटकोपर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या सहकार्यासोबत एनडीपीएस कारवाईसाठी गस्त घालत होते. यावेळी राम रहिम मित्र मंडळाजवळ शाबीर इक्बाल शेख हा ड्रग्ज घेताना दिसून आला, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करताना त्याने स्वतवर ब्लेडने दुखापत केले. मानेवर ब्लेडने वार केल्याने तो जखमी झाला होता. यावेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घालून रविंद्र मोरे यांच्या शर्टाचे कॉलर पकडून धक्काबुक्की केली होती. जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी बळाचा वापर करुन त्याला ताब्यात घेतले होते. याप्रकरणी रविंद्र मोरे यांच्या तक्रारीवरुन शाबीर शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. शाबीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.