मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जुलै 2025
मुंबई, – विविध गुन्हयांतील जप्त मुद्देमालाची तक्रारदारांना परत करण्यात आले होते. ही कामगिरी पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दहाच्या पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी केली. 1 कोटी 67 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल 389 तक्रारदारांना परत मिळाल्याने त्यांनी संबंधित पोलिसांचे आभार व्यक्त केले होते.
गेल्या काही दिवसांत परिमंडळ दहाच्या विविध पोलीस ठाण्यात चोरीसह हरविलेल्या मुद्देमालाबाबत अनेक गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीसह हरविलेल्या मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी संबंधित पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस संजय चव्हाण यांच्यासह इतर पोलीस ठाण्यातील गुन्हे, एटीएस सायबर पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी तपास सुरु केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी काही आरोपींना करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीसह हरविलेला मुद्देमाल हस्तगत केला होता. हा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजता अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड, सेव्हन हिल हॉस्पिटलच्या ऑडीटोरियम हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांत 389 तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला.
त्यात 22 तक्रारदारांना 84 लाख 15 हजार 200 रुपयांचे 936 सोन्याचे दागिने, दोघांना 12 लाख 94 हजार 622 रुपये, बाराजणांना 6 लाख 35 हजाराचे बारा बाईक, प्रत्येकी तिघांना सव्वादोन लाखांचे तीन रिक्षा व 2 लाख 61 हजार रुपयांचे चारचाकी वाहन, 344 जणांना 32 लाख 52 हजार 500 रुपयांचे 344 मोबाईल तसेच तिघांना 3 लाख 43 हजार 775 रुपयांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू (लॅपटॉपसह इतर वस्तू) असा 1 कोटी 67 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमालाचा समावेश होता.
हा मुद्देमाल परत मिळाल्याने 389 तक्रारदारांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त करुन समाधान व्यक्त केले होते. तसेच तपास अधिकारी आणि कर्मचार्यांचे वरिष्ठ अधिकार्यांकडून कौतुक करताना आगामी काळात अशाच प्रकारे कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा देण्यात आले. या कार्यक्रमांत परिमंडळ दहातंर्गत येणार्या सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी, तक्रारदारासह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.