मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जुलै 2025
मुंबई, – गोवंडी येथे राहणार्या शाहिद ऊर्फ सोनू नौशाद शेख या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची त्याच्याच नातेवाईकाने शीतपेयातून विषारी गोळ्या देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल होताच जिशान शब्बीर अहमद या 19 वर्षीय आरोपी नातेवाईकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. शाहिदच्या स्वभावात अचानक बदल झाला होता, तो बोलत नाही, भेटत नाही या रागातून जिशानने शाहिदची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
नौशाद नासीर शेख हा गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहत असून ट्रकचालक म्हणून काम करतो. पत्नी रोशन, मुलगा सायबर आणि मुलगा शाहिद ऊर्फ सोनू असा त्याचा परिवार आहे. 24 जून 2025 रोजी त्यांची पत्नी रोशन ही धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांच्या बिहार येथील मधुबनी गावी गेली होती. यावेळी घरात त्यांच्यासह त्यांचे दोन मुले होती. त्यांच्या घराजवळ त्यांचा सख्खा चुलता जिशान हा त्याच्या मित्रांसोबत भाड्याच्या रुममध्ये राहतो. ते एकाच गावचे रहिवाशी असून मुंबईत जिशान हा कारपेंटरचे काम करतो. 29 जूनला शाहिद हा बाहेर फिरण्यासाठी गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी शाहिदचा सर्वत्र शोध घेतला. त्याचा शोध सुरु असताना तो जिशानच्या घरी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे शाहिदला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शाहिदचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना ही माहिती दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शाहिदचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याच दरम्यान शुक्रवारी शाहिदचा मित्र फैजान खान हा नौशाद शेख यांच्याकडे आला होता. त्याच्याकडून त्यांना काही गोष्टींचा खुलासा झाला होता. दुपारी शाहिद हा त्याच्या मित्रासोबत असताना तिथे जिशान आला होता. त्याने त्या मित्रांसोबत का राहतोस असे सांगून त्याला त्याच्यासोबत नेले होते. सायंकाळी या दोघांना फैजानने एका रिक्षात पाहिले होते. शाहिद रिक्षामध्ये झोपला होता तर त्याच्या शेजारीच जिशान बसला होता. यावेळी त्याने शहिदला काय झाले असे विचारणा केली. यावेळी त्याने शाहिदने स्ट्रिंग कोल्ड्रींग प्यायल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला उलटीचा त्रास झाला असून तो रिक्षात आराम करत असल्याचे सांगितले. त्यानंतर जिशानला त्याला घेऊन त्याच्या घरी गेला होता.
एकूण जिशानची वागणुक संशयास्पद होती. पाच महिन्यांपूर्वी जिशान हा शाहिदसोबत नागपूरला गेला होता. यावेळी त्याने घरात कोणालाही काहीही सांगितले नव्हता. नागपूर येथून घरी येताच शाहिद हा जिशानशी जास्त बोलत नव्हता. त्याला भेटत नव्हता. त्यामुळे तो शाहिदला सतत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत होता. याबाबत शाहिदने त्याच्या आई-वडिलांना सांगितले होते. मात्र जिशान हा त्यांचा चुलत भाऊ असल्याने नौशादने त्याच्याविरुद्ध तक्रार केली नव्हती. त्याचा राग धरुन त्याने शाहिदला स्ट्रिंगमधून विषारी गोळ्या मिसळून पिण्यास प्रवृत्त केले होते. त्यात त्याची प्रकृती बिघडली, त्याला उलट्या सुरु झाल्या होत्या. त्यात त्याची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला होता.
हा प्रकार उघडकीस येताच नौशादने जिशानविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जिशानविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.