1993 दंगलीच्या वॉण्टेड आरोपीस 32 वर्षांनी अटक

जामिनावर बाहेर येताच सुनावणीसाठी गैरहजर राहत होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जुलै 2025
मुंबई, – मुंबई शहरात 1993 साली झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस 32 वर्षांनी अटक करण्यात वडाळा पोलिसांना यश आले आहे. आरिफ अली हशमुल्लाखान असे या 54 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दंगलीच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर येताच आरिफ अली हा खटल्याच्या सुनावणीसाठी गैरहजर राहत होता. अखेर 32 वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरिफ अलीला पोलिसांनी अटक केली.

बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबई शहरात जातीय दंगली उसळल्या होत्या. वडाळा परिसरात झालेल्या दंगलीप्रकरणी वडाळा पोलिसांनी काही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर आरिफ अलीला पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टाने अटकपूर्व वॉरंट जारी करताना त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश जारी केले होते.

या आदेशांनतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याच्या अटकेसाठी एक टिम त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी गेले होते, मात्र तो गावाहून पळून गेला होता. गेल्या 32 वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. प्रत्येक वेळेस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात होता. तरीही त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना आरिफ अली हा काही महिन्यांपासून अ‍ॅण्टॉप हिल येथील दिनबंधूनगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिवन देशमुख, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद, पोलीस उपनिरीक्षक सौरभ मुसळे, शरद खाटमोडे, पोलीस हवालदार कासार, दहिफळे, पोलीस शिपाई कलाने, चौधरी, वलेकर, शेलार, मखरे यांनी साध्या वेशात दिनबंधू नगर परिसरात त्याचा शोध सुरु केला होता. यावेळी एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत तोच आरिफ अली तसेच गेल्या 32 वर्षांपासून वॉण्टेड असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला फेरअटक करुन दुसर्‍या दिवशी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page