मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जुलै 2025
मुंबई, – कोकेन ड्रग्ज तस्करीप्रकरणी एका विदेशी व्यावसायिकाला वरळी युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. फ्रॅक चिबजोर नॅण्डी असे 43 वर्षीय नागकिाचे नाव असून तो नायजेरीयन नागरिक आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन कोटीचे दोनशे ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन, पाच लाखांची होंडा सिविक कार आणि सत्तर हजार रुपयांचे तीन मोबाईल असा दोन कोटी पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने सोमवार 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीचे प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्काराविरुद्ध वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अॅण्टी नारकोटीक्स सेलला कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीत हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना मालाड परिसरात काही विदेशी नागरिक ड्रग्ज खरेदी-विक्रीसाठी येणार असल्याची प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सावंत व अन्य पोलीस पथकाने मालाडच्या ऑरलेम मार्वे रोड, जे. पी कॉलनी परिसरात साध्या वेशात गस्त सुरु केली होती. यावेळी फ्रॅक नॅण्डी नावाच्या एका विदेशी नागरिकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोनशे ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात दोन कोटी रुपये इतकी किंमत आहे.
या कोकेनसह एक महागडी कार आणि तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले. तपासात फ्रॅक हा मूळचा नायजेरीन नागरिक असून तो व्यावसायिक आहे. तो व्यावसायिक व्हिसावर मुंबईत आला होता.काही महिन्यांपासून तो मालाड परिसरात राहत होता. व्यवसायाच्या आड तो ड्रग्ज तस्करी करत असल्याचे उघडकीस आले. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ते कोकेन कोणी दिले, ते कोकेन तो कोणाला देणार होता, त्यापूर्वीही त्याने ड्रग्जची खरेदी-विक्री केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.