ब्लॅकमेलसह खंडणीच्या धमक्यांना कंटाळून सीएची आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेसह दोघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मुंबई, – रविवाारी रात्री उशिरा सांताक्रुज येथील राहत्या घरी राज लिला मोरे या 32 वर्षांच्या सीएने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ब्लॅकमेलसह खंडणीच्या सततच्या धमक्यांना कंटाळून राजने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसायट नोटवरुन उघडकीस आले आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याच्या दोन्ही आरोपी मित्रांना वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल पारवानी आणि सबा कुरेशी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
ही घटना रविवारी रात्री उशिरा सांताकुज येथील वाकोला, श्रीकृष्णनगर, कमलाबाई शेट्टी चाळीत घडली. या चाळीतील रुम क्रमांक दोनमध्ये लिला दामोदर मोरे ही 65 वर्षांची वयोवृद्ध महिला राहते. राज हा तिचा 32 वर्षांचा मुलगा असून तो सायन येथील एका खाजगी कंपनीत सीए म्हणून कामाला होता. मे महिन्यांत लिला हिला तिचे कपाटातील लॉकरमधील काही दागिने दिसले नाही. त्यामुळे तिने राजकडे विचारणा केल्यानंतर त्याने ते दागिने गहाण ठेवून त्याचा मित्र राहुल पारवानी याला कर्ज दिल्याचे सांगितले होते. याच दरम्यान त्याने त्याची कारही राहुलला दिली होती. काही दिवसांनी त्याने तिला सात लाख रुपये आणून दिले होते. ते पैसे देऊन दागिने आणतो असे सांगितले होते. याच दरम्यान तिला राजचे राहुलसोबत कुठल्या तरी विषयावरुन वाद सुरु असल्याचे लक्षात आले होते.
राहुलकडे त्यांच्यातील समलैगिंक संबंधाचे काही व्हिडीओ होते, या संबंधाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन राहुलसह सबा कुरेशी हे दोघेही त्याला ब्लॅकमेल करत होते. त्याच्याकडे सतत पैशांची मागणी करत होते. पैसे दिले नाहीतर त्याची बदनामीची धमकी देत होते. बदनामीच्या भीतीने राजने राहुलला 2 कोटी 44 लाख 80 हजार तर सबा हिला 2 लाख 60 हजार रुपये दिले होते. तरीही ते दोघेही त्याचा मानसिक शोषण करुन, ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करत होते. याच ब्लॅकमेलला कंटाळून रविवारी 6 जुलैला रात्री राजने त्याच्या राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केली होती.
ही माहिती नंतर वाकोला पोलिसांना देण्यात आली होती. घटनास्थळी पोलिसांना तीन सुसायट नोट सापडल्या. त्यात राजने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. या पत्रावरुन राजच्या आत्महत्येला राहुल आणि सबा हेच जबाबदार असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी लिला मोरे हिची जबानी नोंदवून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध खंडणीसाठी ब्लॅकमेल करुन राजला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मंगळवारी राहुल आणि सबा या दोघांनाही वेगवेगळ्या परिसरातून वाकोला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्यांना बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करुन त्यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.