मोस्ट वॉण्टेड गॅगस्टर प्रसाद पुजारीची चीनमध्ये ४० कोटीची प्रॉपटी
हॉटेलसह मोबाईल ऍक्सेसरीमध्ये कुटुंबियांसाठी गुंतवणुक केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – मोक्का कायद्यांतर्गत पोलीस कोठडीत असलेला गॅगस्टर प्रसाद ऊर्फ सुभाष विठ्ठल पुजारी ऊर्फ सिद्धार्थ शेट्टी ऊर्फ सिद्धू ऊर्फ जॉनी याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याच्या चौकशीतून प्रसादने चीनमध्ये ४० कोटीची प्रॉपटी जमा केली असून हॉटेलसह मोबाईल ऍक्सेसरीमध्ये त्याने त्याच्या कुटुंबियांच्या नावाने मोठी गुंतवणुक केल्याची कबुली दिली आहे. विदेशात पळून गेल्यानंतर त्याने हॉंगकॉंग येथे कुमार पिल्लेशी दोन वेळा भेट घेतली होती. तसेच छोटा राजनसाठी त्याने एक मोठे काम केले होते. मात्र कुमार पिल्लेच्या भेटीसह छोटा राजनच्या कामाविषयी काहीही माहिती सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
गेल्या २० वर्षांपासून प्रसादचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरु होता. त्याच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पूर्वी तो कुमार पिल्ले टोळीसाठी काम करत होता. कुमार पिल्लेनंतर तो छोटा राजन टोळीत सामिल झाला होता. नंतर त्याने स्वतची टोळी बनवून त्याच्या सहकार्याच्या मदतीने मुंबई, ठाणे, नवी मुंबईत टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. डिसेंबर २०१९ रोजी विक्रोळीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि व्यावसायिक चंद्रकांत जाधव यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रसादचे नाव समोर आले होते. चीनमधून प्रत्यार्पण केल्यानंतर त्याचा ताबा मुंबई पोलिसांनी घेतला होता. त्यानंतर त्याला चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने मोक्का कायद्यांतर्गत अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरु आहे.
याच चौकशीत त्याने २००५ साली दोन वेळा कुमार पिल्लेची हॉंगकॉंग येथे भेटल्याचे सांगितले. त्यासाठी तो स्टुडंट व्हिसावर हॉंगकॉंगमध्ये आला होता. विक्रोळी येथे क्रिकेट खेळताना त्याची पहिली भेट कुमार पिल्लेशी झाली होती. त्या वेळेस कुमार पिल्लेची पूर्व उपगरात प्रचंड दहशत होती. त्यामुळे तो त्याच्या टोळीत सामिल झाला होता. त्याच्यासाठी त्याने किरकोळ गुन्हे केले होते. या गुन्ह्यांत त्याला नंतर अटक झाली होती. त्याला गुन्हेगारी जगतात कुमार पिल्लेपेक्षा मोठे व्हायचे होते. कुमार पिल्लेनंतर तो छोटा राजन टोळीत सामिल झाला होता. छोटा राजनसाठी त्याने अनेकांना खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र काही वर्षांनी त्याने छोटा राजनपासून फारकत घेऊन स्वतची टोळी बनविली होती. एकीकडे टोळीचा दबदबा निर्माण करत असताना त्याने कुमार पिल्ले आणि छोटा राजनशी चांगले संबंध ठेवले होते. त्याने त्यांना कधीच क्रॉस करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे विदेशात पळून गेल्यानंतर तो पहिल्यांदा कुमार पिल्लेला भेटला होता. तिथेच त्याची एका चीनी महिलेशी प्रेम झाले होते. नंतर या दोघांनी लग्न केले होते. त्यांना तीन मुले असून त्याचा मोठा मुलगा सतरा, दुसरा मुलगा नऊ वर्षांचा तर तिसरा मुलगा चार महिन्यांचा आहे.
चीनमधील शेनझेन हे जगतातील सर्वांत मोठे मोबाईल ऍक्सेसरीजचा व्यवसाय असलेले शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्याने त्याच्या पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या मदतीने तिथे मोबाईल ऍक्सेसरीजचा व्यवसाय सुरु केला होता. त्याच बरोबर त्याने हॉटेल व्यवसायात मोठी गुंतवणुक केली होती. अल्पवधीत त्याने चीनमध्ये ४० कोटीची प्रॉपटी जमा केली होती. त्याच्या व्यवसाय त्याची पत्नी आणि तिचे कुटुंबिय चालवत असून तो त्यांना मदत करतो. २००४ साली प्रसाद पुजारीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. एक वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर २००५ साली त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर तो मुंबई सोडून विदेशात पळून गेला होता. २०२३ पर्यंत प्रसादविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी उकाळणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अवैध शस्त्रे बाळगणे आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलमांतर्गत आठ गुन्ह्यांची नोंद झाली होती. हॉंगकॉंगहून शेनझेनला जात असताना त्याला चीनी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध बोगस पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. चौकशीदरम्यान तो प्रसाद पुजारी असल्याचे तसेच त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला भारतात पाठविण्यात आले होते. चीनमधून प्रत्यार्पण झालेला प्रसाद हा पहिला गॅगस्टर आहे. सध्या तो पहिल्या गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असून त्याचा लवकरच इतर सात गुन्ह्यांत पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे. त्याच्या चौकशीतून जास्तीत जास्त माहिती काढण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत.