मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या नावाने एका व्यक्तीची सोळा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी म्हाडा एजंट असलेल्या ऋतुजा जयेश मोडक या महिलेविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. फसवणुक करणारी ही सराईत टोळी असल्याचे बोलले जाते. या टोळीने तक्रारदारासह इतर लोकांची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
५३ वर्षांचे तक्रारदार गोपीचंद सखाराम प्रभुलकर हे त्यांच्या कुटुंबियांसोबत प्रभादेवी येथे राहत असून ते सिक्युरिटीचे काम करतात. त्यांचे घर लहान असल्याने ते दुसर्या फ्लॅटच्या शोधात होते. यावेळी त्यांच्या एका मित्राने त्याच्या मैत्रिणीची ओळखीची मॅडम म्हाडामध्ये कामाला आहे. ती गिरणी कामगारांची घर स्वस्तात मिळवून देते असे सांगितले होते. यावेळी या मैत्रिणीने त्यांची ओळख ऋतुजा मोडकशी करुन दिली होती. जुलै २०२२ रोजी झालेल्या भेटीत तिने ती म्हाडामध्ये एजंटचे काम करत असून तिच्या ओळखीतून तिने अनेकांना म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत असे सांगितले होते. तिने त्यांनाही २५ लाखांमध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. तिला आधी एक लाख रुपये द्यावे लागतील, नंतर साडेबारा लाख रुपये आरटीजीएस करुन उर्वरित रक्कमेचे ती बँकेतून लोन काढून देईल असे सांगितले होते. म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट मिळत असल्याने त्यांनी तिला एक लाख रुपये दिले होते. दुसर्या दिवशी तिने त्यांना लालबाग येथे बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर ऋतुजाने त्यांना एका एजंटच्या मदतीने वेस्टर्न हाईट्स या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅट ८०१ दाखविला. हा म्हाडाचा फ्लॅट असून तोच फ्लॅट त्यांना देणार असल्याचे सांगून तिने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांना तो फ्लॅट आवडला होता. त्यामुळे तिने त्यांना साडेबारा लाख रुपये कॅश स्वरुपात देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी तिला साडेबारा लाख रुपये दिले होते.
काही दिवसांनी ती विविध कारण सांगून त्यांच्याकडून आणखीन पैशांची मागणी करु लागली. फ्लॅटसंदर्भात म्हाडामध्ये सुनावणी सुरु असल्याचे सांगून ती त्यांना सतत टाळण्याचा प्रयत्न करत होती. लवकरच सुनावणी पूर्ण होऊन त्यांना फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगत होती. मात्र ही सुनावणी संपत नव्हती. प्रत्येक वेळेस सुनावणी रद्द झाली असून पुढील तारीख लवकरच मिळेल असे सांगून तिच्याकडून त्यांची दिशाभूल सुरु होती. त्यामुळे त्यांनी म्हाडाचा फ्लॅट नको, फ्लॅटसाठी दिलेली रक्कम परत करा असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे तिने त्यांना सोळा लाखांचा एक धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ऋतुजा मोडकविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ऋतुजा मोडक हिच्याविरुद्ध पोलिसांनी फसवुणकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. म्हाडाच्या फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, या गुन्ह्यांत तिला इतर कोणी मदत केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.