रद्द केलेल्या विमान तिकिटाच्या रिफंडच्या नावाने गंडा
वयोवृृद्ध महिलेच्या तक्रारीवरुन सायबर ठगाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जुलै 2025
मुंबई, – रद्द केलेल्या विमान तिकिटाच्या रिफंडच्या नावाने एका वयोवृद्ध निवृत्त अधिकारी महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे साडेसात लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत जुहू पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. गुगलवर विमान कंपनीच्या कस्टमर केअरचा मोबाईल काढणे या वयोवृद्ध महिलेला चांगलेच महागात पडले आहे.
77 वर्षांची वयोवृद्ध तक्रादार महिला सांथा नंदकुमार मेनन ही तिच्या पतीसोबत जुहू येथे राहत असून ती निवृत्त अधिकारी आहे. एप्रिल महिन्यांत तिने एका खाजगी वेबसाईटवरुन केरळचे इंडिगो एअरलाईन्सचे दोन विमानाचे तिकिट बुक केले होते. मात्र ही बुकिंग नंतर तिने रद्द केली होती. तिच्या बँक खात्यात रिफंडची रक्कम जमा होणे अपेक्षित होते, मात्र बरेच दिवस उलटूनही तिला रिफंडची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे तिने इंडिगो एअरलाईन्सच्या कस्टमर सपोर्टचा क्रमांक मिळवून तिथे संपर्क साधला होता.
यावेळी समोरील व्यक्तीने तो कस्टमर केअरमधून बोलत असल्याची माहिती सांगून तिच्याकडून तिच्या बँक खात्याची डिटेल्स घेतली होती. त्यामुळे तिने त्याला तिच्या बँकेची सर्व डिटेल्स दिली होती. ही माहिती दिल्यानंतर तिच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. पैसे डेबीट झाल्याचे मॅसेज प्राप्त होताच तिने हा प्रकार बँकेत जाऊन सांगितला. तसेच तिच्या बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्याची विनंती केली. पासबुकची तपासणी केल्यानंतर तिच्या बँक खात्यातून साडेसात लाखांचे ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले.
अशा प्रकारे अज्ञात व्यक्तीने रिफंडसाठी बँक खात्याची डिटेल्स घेऊन तिची ऑनलाईन फसवणुक केली होती. त्यामुळे तिने सायबर क्राईम हेल्पलाईनसह जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा जुहू पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढून संबंधित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.