मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जुलै 2025
मुंबई, – आंतरराष्ट्रीय बाजारात 2 कोटी 36 लाख रुपये किंमत असलेल्या विविध ड्रग्जच्या साठ्यासह दोन आरोपींना अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या आझाद मैदान आणि कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 306 हेरॉईन, 104 ग्रॅम एमडी आणि 703 ग्रॅम वजनाचे चरस, अठरा लाखांची कॅश असा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्यांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अॅण्टी नारकोटीक्स सेलने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात काहीजण चरससह एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी सोमवारी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून फैजान इरफान गौर या संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 703 ग्रॅम वजनाचे चरस, 104 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज तसेच अठरा लाखांची कॅश असा एक कोटी चौदा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. कॅशसहीत ड्रग्ज ताब्यात घेतल्यानंतर त्याला युनिट कार्यालयात आणण्यात आले. चौकशीत तो अंधेरी येथे ड्रग्ज विक्रीसाठी आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले.
ही कारवाई ताजी असताना मंगळवारी 8 जुलैला अंधेरीतील वर्सोवा परिसरातून कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी हेरॉईनची विक्रीसाठी आलेल्या एका संशशियाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी एक कोटी बावीस लाख चाळीस हजार रुपयांचा 306 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी हेरॉईन, चरस आणि एमडी ड्रग्जसहीत अठरा लाखांची कॅश असा 2 कोटी 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपीविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ झवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे व आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांनी केली.