मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जुलै 2025
मुंबई, – डिझाईनसाठी घेतलेल्या सुमारे अठरा लाखांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका महिलेची फसवणुक केल्याच्या कटातील वॉण्टेड आरोपीस कांदिवली पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. राजेशकुमार चिमलाल सोनी असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहेत. या कटातील मुख्य आरोपी भौतिक रमेश शहा याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध लोकल कोर्टात आरोपपत्र सादर केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहम कदम यांनी सांगितले. या गुन्ह्यांत अटक झालेला राजेशकुमार हा दुसरा आरोपी आहे.
40 वर्षांची तक्रारदार महिला कांदिवली परिसरात राहते. तिचे पती व्यावसायिक असून तिच्या पतीचा ग्रॅटरोड येथे व्यवसाय आहे. गेल्या वर्षी तिची सोशल साईटवर भौतिक शहाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याने तिला प्रपोज केले होते, मात्र तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. चर्चेदरम्यान भौतिकने तो बंगलोरला राहत असून त्याचा सोन्याचे दागिन्यांचा व्यवसाय आहे. त्याचा स्वतचा एक शोरुम असून त्यात 30 ते 40 लोक करतात. तो नेहमीच तिला त्याच्या दागिन्यांच्या ऑर्डरची माहिती देत होता. दागिन्यांचे फोटो पाठवत होता. त्याच्या बोलण्यावरुन तो दागिन्यांचा मोठा व्यापारी असल्याचे तिला वाटले होते.
काही दिवसांनी त्याने तिच्या काही दागिन्यांची मागणी केली होती. या दागिन्यांचे डिझाईन बनवून तो त्याच्या शोरुममध्ये विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने तिला काही रक्कम कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत तो मुंबईत आला होता. यावेळी त्यांची मिरारोड येथील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीदरम्यान तिला त्याच्यावर विश्वास बसला होता. यावेळी त्याने तिच्याकडे पुन्हा तिच्या दागिन्यांची मागणी केली होती. तिच्या दागिन्यांची डिझाईन मशिनमध्ये बनवून तिला पुन्हा दागिने देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिने त्याला तिचे 18 लाखांचे सोन्याचे विविध सोन्याचे दागिने दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिला दागिने परत केले नाही. विचारणा केल्यानंतर तो तिला विविध कारण सांगून टाळत होता. त्याने दागिने एका व्यक्तीला दिले असून ते दागिने सोडविण्यासाठी त्याला एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून त्याने तिच्याकडून एक लाखांची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्याला एक लाख रुपये पाठविले होते. मात्र त्याने दागिन्यासह पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर भौतिक शहाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला जानेवारी महिन्यांत पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत राजेशकुमार सोनी याचा सहभाग उघडकीस आला होता. भौतिककडून राजेशकुमारने ते दागिने घेतले होते. या गुन्ह्यांत तो रिसीव्हर होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहम कदम व अन्य पोलीस पथकाने गुजरात येथून राजेशकुमारला अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.