मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जुलै 2025
मुंबई, – अंधेरी येथे राहणार्या कशिश कपूर हिच्या नोकराने सुमारे चार लाखांची कॅश चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सचिनकुमार चौधरी या नोकराविरुद्ध आंबोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
कशिश पवनकुमार कूपर ही मूळची बिहारच्या पूर्णियाची रहिवाशी असून सध्या ती अंधेरीतील विरा देसाई रोड, आझादनगर, न्यू आंबिवली सोसायटीमध्ये राहते. ती सिनेअभिनेत्री असून तिने काही टिव्ही शोमध्ये भाग घेतला असून बिग बॉसमध्ये ती स्पर्धेक म्हणून आली होती. गेल्या पाच महिन्यांपासून तिच्याकडे सचिनकुमार घरगडी म्हणून कामाला होता. सकाळी साडेअकरा वाजता कामावर आल्यानंतर तो सर्व काम करुन दुपारी एक वाजता निघून जात होता. तिने तिच्या कपाटातील ड्राव्हरमध्ये काही कॅश ठेवली होती. 6 जुलैला तिने कॅशची पाहणी केल्यानंतर त्यात सात लाख रुपये होते.
9 जुलैला तिला तिच्या आईला गावी काही कॅश पाठवायची होती. त्यामुळे तिने कपाटातील ड्राव्हरमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तिला अडीच लाख रुपये सापडले. उर्वरित साडेचार लाख रुपये मिसिंग असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने संपूर्ण कपाटाची पाहणी केली, मात्र तिला कुठेच पैसे सापडले नाही. कामात असलेल्या सचिनकुमारकडे तिने विचारणा केली असता तो प्रचंड घाबरला होता. तिने त्याचे खिसे तपासण्याचा प्रयत्न केला,
मात्र त्याने खिसे तपासण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने 50 हजार रुपये काढून पळून गेला होता. सचिनकुमारने चार लाखांची चोरी केल्याचे लक्षात येताच तिने त्याच्याविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. पळून गेलेल्या सचिनकुमारचा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारीही शोध घेत आहेत.