मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जुलै 2025
मुंबई, – वाहतूक विभागात सहाय्यक फौजदार असलेले शंकर भिकाजी सोळसे (56) यांनी रविवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिड वर्षांपूर्वी शंकर सोळसे यांचा अपघात होऊन त्याच्या पायाचे ऑपरेशन झाले होते. त्याचा यांना प्रचंड त्रास होत होता. याच त्रासामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
रंजना शंकर सोळसे या विक्रोळीतील पार्कसाईट, वर्षानगर, शिवराज सोसायटीमध्ये राहतात. शंकर हे तिचे पती असून ते सध्या विक्रोळी वाहतूक विभागात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री बारा वाजता जेवण झाल्यानंतर रंजना या घरातील पोटमाळ्यावर झोपण्यासाठी गेल्या तर तळमजल्यावर शंकर हे झोपले होते. मध्यरात्री दोन वाजता त्यांना जाग आली असता शंकर हे झोपले असल्याचे तिच्या निदर्शनास आले होते. सकाळी साडेआठ वाजता रंजना या नेहमीप्रमाणे उठल्यानंतर तिला शंकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेने तिला धक्काच बसला होता.
स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शंकर यांना तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉ. रमेश यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर रंजना सोळसे यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात दिड वर्षांपूर्वी शंकर यांचे अपघात झाले होते. त्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले होते. त्याचा त्यांना प्रचंड त्रास होत होता.
या त्रासाला ते प्रचंड कंटाळून गेले होते. त्यातून त्यांना मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शंका रंजना सोळसे यांनी त्यांच्या जबानीत म्हटले आहे. या आत्महत्येबात त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.