मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जुलै 2025
मुंबई, – विलेपार्ले येथील एका व्यावसायिकाच्या घरी झालेल्या 1 कोटी 15 लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात जुहू पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. राहुल सदाशिव मुदाने आणि सनी चाद पवार अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 81 लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण यांनी सांगितले. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध घरफोडीच्या इतर काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
विक्रम धीरजलाल शहा हे व्यावसायिक असून त्यांचा स्वतचा एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपाले्र येथील जेव्हीपीडी स्किम, अशोकनगर सोसायटीच्या स्प्रिंग विल अपार्टमेंटमध्ये राहतात. 23 जूनला ते त्यांच्या कुटुंबियांसोबत आफ्रिका येथे फिरायला गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. ही संधी साधून काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. कपाटातील विविध हिरे, सोन्याचे दागिने, आठ महागडे घड्याळ असा 1 कोटी 15 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. 5 जुलैला ते त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांचा फ्लॅट अर्धवट उघडा असल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी आत जाऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांना कपाटातील विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि महागडे घड्याळ आदी मुद्देमालाची चोरी झाल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर त्यांनी जुहू पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित यांनी गंभीर दखल घेत जुहू पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक फौजदार गजानन पाटील, पोलीस हवालदार अमीत महागंडे, नितीन मांडेकर, अर्जुन घाडीगावकर, मंगेश खोमणे, पोलीस शिपाई आकाश घोडके, तुषार पन्हाळे, अनिल तायडे, प्रितम भोसले, हेलकर, तासगावकर, स्वप्नील पवार यांनी तपास सुरु केला होता.
या पथकाने आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन ही घरफोडी 28 जूनला रात्री दोन ते पहाटे साडेचारच्या दरम्यान झाली होती. त्यात एका आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते. त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपासात घरफोडीच्या गुन्ह्यांत संबंधित आरोपी त्याच्या पत्नीसह राहते घर सोडून पंजाबला पळून गेल्याचे समजले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण व अन्य पोलीस पथकाने सनी पवार याला पंजाबच्या झिरकपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने राहुलच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या पथकाने नवी मुंबईतून राहुलला अटक केली.
अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असताना त्यांनी चोरीचा सुमारे 81 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यात 1609 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने, एक अॅक्टिव्हा स्कूटीचा समावेश आहे. उर्वरित चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. सनी पवार आणि राहुल मुदाने हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध वर्सोवा, सांताक्रुज, आंबोली पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले आहे.