बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग
विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत पोलीस शिपायाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जुलै 2025
मुंबई, – बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलीस शिपायाला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. इमारतीच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाल्यानंतर आरोपी पोलीस शिपायाविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीत मुलगी आणि आरोपी शिपाई एकाच इमारतीमध्ये राहत असून एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार महिला आग्रीपाड्यातील एका निवासी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर राहते. बळीत ही तिची बारा वर्षांची मुलगी आहे. शनिवारी पूजेनिमित्त तिची मुलगी प्रसाद घेण्यासाठी इमारतीच्या खाली आली होती. यावेळी याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहणार्या आरोपी पोलीस शिपायाने तिला लिफ्टमधून जाण्यास मनाई केली. तिचा हात पकडून तो तिला जिन्यावरुन खाली घेऊन आला. हा प्रकार एका रहिवाशांनी पाहिला आणि त्याने बळीत मुलीच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने तिच्या मुलीची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिने आरोपीविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी इमारतीच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात आरोपी शिपाई या मुलीसोबत जिन्यासोबत हात पकडून येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर या महिलेच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर सोमवारी त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
आरोपी हा मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून सध्या त्याची नेमणूक ताडदेव येथील सशस्त्र पोलीस विभागात आहे. गेल्या महिन्यांत मुंबई पोलीस दलातील सशस्त्र दलाच्या एका पोलीस शिपाई हेमंत कापसे, चंद्रशेखर दराडे यांना त्यांच्या दोन सहकार्यासह डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. या चौघांनी एका पान मसाला विक्री करणार्या व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडे खंडणी वसुली केली होती. ही कारवाई ताजी असताना आता दुसर्या गुन्ह्यांत एका पोलीस शिपायाला विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक झाली आहे.