मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जुलै 2025
मुंबई, – आंधप्रदेश आणि मध्यप्रदेशातून आलेल्या मित्रांसोबत मद्यप्राशन करुन जुहू बीचमध्ये कारने प्रवेश करणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले. मद्यप्राशन करुन कार चालविणे, प्रतिबंधित परिसरात कारने प्रवेश करुन पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी या तिन्ही तरुणांविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी गुन्हा दाखल करुन गुन्ह्यांतील कार जप्त केली आहे. तरुण यादव, नजीब सय्यद आणि ब्रिजेश सोनी अशी या तिघांची नावे आहेत. दरम्यान वाळूमध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी टॅक्टरच्या मदतीने तीन तास अथक परिश्रम करावे लागले होते.
तरुण यादव हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो सध्या खार परिसरात राहतो. नजीब आणि ब्रिजेश हे दोघेही त्याचे मित्र असून ते दोघेही अनुक्रमे आंधप्रदेश आणि मध्यप्रदेशात राहतात. बरेच महिने त्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे तरुणने या दोघांनाही मुंबई दर्शनासाठी मुंबईत बोलाविले होते. त्यामुळे ते दोघेही त्याच्या खार येथील राहत्या घरी आले होते. शुक्रवारी दिवसभर मुंबई दर्शन केल्यानंतर रात्री या तिघांनी मद्यप्राशन केले होते. त्यानंतर ते तिघेही त्यांच्या कारमधून जुहू बीचला आले होते. यावेळी त्यांनी कार समुद्रकिनार्यावर नेली. दारुच्या नशेत त्यांनी कार भरवेगात चालविण्यचा प्रयत्न केला होता.
या प्रयत्नात कार वाळूमध्ये अडकली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करुन मदतीसाठी आवाज देण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे गस्त घालणार्या पोलिसांना हा प्रकार लक्षात आले. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी तिघांना तेथून बाजूला केले. त्यानंतर अग्निशमन दलाला तिथे बोलाविण्यात आले. स्थानिक पोलिसासह अग्निशमन दलाने टॅक्टरच्या मदतीने जवळपास तीन तासांनी वाळूत अडकलेली कार बाहेर काढली. या घटनेनंतर तिघांनाही पुढील कारवाईसाठी सांताक्रुज येथे नेण्यात आले.
प्राथमिक तपासात या तिघांनी मद्यप्राशन केले होते. त्यातच त्यांनी मदतीसाठी आलेल्या पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या तिघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांची कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार तरुण यादव चालवत होता, त्यामुळे त्याचे ड्रायव्हिंग रद्द होण्यासाठी पोलिसांकडून लोकल कोर्टात अर्ज केला जाणार आहे. मद्यप्राशन करुन कार जुहू बीच समुद्रात नेऊन भरवेगात कार चालविणे या तिघांना चांगलेच महागात पडले आहे.