बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ईमेल

धमकीचा मेल पाठविणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 जुलै 2025
मुंबई, – बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या फिरोज टॉवर इमारतीमध्ये चार आरडीएक्स बॉम्ब ठेवण्यात आले असून यातील पहिला बॉम्बचा दुपारी तीन वाजता स्फोट होणार असल्याचा एक ईमेल सोमवारी अज्ञात व्यक्तीने पाठविला होता. मात्र संपूर्ण बॉम्ब स्टॉक एक्सचेंजची तपासणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी कॉम्रेड पिनाराई विजयान या व्यक्तीविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी बोगस मेल पाठवून दशहतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी या धमकीनंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सुजीत अशोक जाधव हे बदलापूरच्या न्यू बेलवली, डी. पी रोड, प्रेशियस हार्मोंनी अपार्टमेंटमध्ये राहतात. सध्या ते फोर्ट येथील दलाल स्ट्रिट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे एक अधिकृत ईमेल आयडी आहे. रविवारी 13 जुलैला सकाळी सव्वाअकरा वाजता या ईमेलवर कॉमे्रड पिनाराई विजयान नावाच्या एका अज्ञात व्यक्तीने एक मॅसेज आला होता. त्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या फिरोज टॉवर्स इमारतीमध्ये चार आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवण्यात आले आहे. या बॉम्बचा कुठल्याही क्षणी स्फोट होणार आहे. त्यातील पहिला बॉम्बस्फोट दुपारी तीन वाजता होणार आहे असे नमूद केले होते.

रविवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सुट्टी होती, त्यामुळे सोमवारी सुजीत जाधव हे कामावर हजर झाले होते. यावेळी त्यांना हा ईमेलवरील धमकी निदर्शनास आली होती. त्यानंतर त्यांनी ही माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यासह माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकासह संपूर्ण इमारतीची तपासणी केली होती. मात्र तिथे पोलिसांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. बॉम्बस्फोटाचा तो ईमेल बोगस असल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

या घटनेनंतर सुजीत जाधव यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कॉमे्रड पिनाराई विजयान याच्याविरुद्ध बॉम्बस्फोटाची धमकी देऊन भीतीयुक्त वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा मेल कोणी पाठविला, तो कोठून आला होता यासाठी गुन्हे शाखेसह सायबर सेलची माहिती घेतली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page