सोशल मिडीयावर महिलेचा व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी
पुण्याच्या २३ वर्षांच्या आरोपी तरुणाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर महिलेचा व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी केल्याप्रकरणी एका २३ वर्षांच्या पुण्याच्या तरुणाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. सैफअली अर्शद शेख असे या २३ वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल आणि सिमकार्ड जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल हस्तगत केला असून त्यात अनेक महिलांचे व्हिडीओ सापडले आहे. भगवा लव्ह ट्रॅप या शीर्षकाखाली त्याने काही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. सैफअली हा मूळचा पुण्याच्या येरवडा, वंजारी हॉस्पिटलजवळील नवी खडकी, जनता नगरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
३१ वर्षांची तक्रारदार महिला ही चेंबूर येथे राहत असून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २३ जानेवारीला ती तिच्या मोबाईलवर काही रिल्स पाहत होती. यावेळी तिला तिच्यासह तिच्या सहकार्याचा एक व्हिडीओ दिसला होता. डिसेंबर २०२३ रोजी ती तिच्या सहकार्यासोबत अंधेरी रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहत होती. यावेळी तिचा कोणीतरी व्हिडीओ काढून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला होता. या व्हिडीओखाली त्याने एक और नालायक बाप की नालायक बेटी का नतीजा असा मजकूर दिला होता. अशा प्रकारे अज्ञात व्यक्तीने तिच्याविषयी अपप्रचार करुन तिची सोशल मिडीयावर बदनामीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार चुन्नाभट्टी पोलिसांना सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. हा गुन्हा अंधेरी रेल्वे स्थानकात घडल्याने त्याचा तपास नंतर अंधेरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ५०९ भादवी सहकलम ६७ आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासादरम्यान संबंधित व्यक्तीने तो व्हिडीओ मोबाईलवरुन सोशल मिडीयावर अपलोड केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ज्या मोबाईलमधून हा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला.
चौकशीत सिमकार्ड एका महिलेच्या नावावर होते. तिच्या सिमकार्डवरुन सैफअली शेख याने तो व्हिडीओ व्हायरल केला होता. ही माहिती प्राप्त होताच सैफअलीला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याला अटक करुन नंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल एक सिमकार्ड जप्त केले आहे. त्यात काही महिलांचे छुप्या पद्धतीने तयार केलेले अनेक व्हिडीओ सापडले आहेत. ते व्हिडीओ त्याने कोठून मिळविले. सोशल मिडीयावर व्हायरल करताना त्याने भगवा लव्ह ट्रॅप या शीर्षकाखाली ते व्हिडीओ व्हायरल केले होते. त्यामागे त्याचा उद्देश काय होता. यामागे कुठली संघटना सक्रिय आहे का. व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी त्याला कोणी आर्थिक मदत केली का. ज्या महिलांचे व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये सापडले, त्यांच्याशी त्याचा काय संबंध आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.