ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित गुंतवणुकीच्या नावाने सिनेअभिनेत्रीची फसवणुक
बंगाली निर्मात्यासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 जुलै 2025
मुंबई, – ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होणार्या सोळा नवीन चित्रपटाचे प्रसारण हक्क आणि वायकॉम अठरा ओटीटीवर संबंधित चित्रपट प्रदर्शित करण्याच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून हिंदीसह भोजपुरी आणि तमिळ मालिका आणि चित्रपटातील एका सिनेअभिनेत्रीची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शाम सुंदर डे, सारर्थी सुजीतकुमार गुहा आणि नेताई बाबूलाल मोडल अशी या तिघांची नावे असून यातील शाम डे हे बंगाली चित्रपटातील निर्माते असून इतर दोन आरोपी त्यांचे सहकारी आहेत. गुंतवणुकीच्या बहाण्याने या त्रिकुटाने सिनेअभिनेत्रीची 1 कोटी 58 लाखांची फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. शाम डे यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा दुसरा फसवणुकीचा गुन्हा असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध कोलकाता येथे एका व्यावसायिकाची सुमारे पावणेतीन कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
पूजा निखिल बॅनर्जी ही सिनेअभिनेत्री असून ती सध्या तिच्या कुटुंबियांसोबत मालाड येथे राहते. तिने आतापर्यंत अनेक हिंदी, भोजपुरी आणि तामिळ मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यात तुझ संग प्रीत लगाई संजना, कुमकुम भाग्य या मालिकासह तमिळ चित्रपट वीदू थेडा या चित्रपटाचा समावेश आहे. एप्रिल महिन्यांत तिच्याकडे बंगाली निर्माते शाम सुंदर डे यांनी एक प्रस्ताव आणला होता. त्यात त्यांनी तिच्यासह तिचे पती कुणाल वर्मा यांना 2025 साली ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होणार्या सोळा चित्रपटाचे प्रसारणाचे हक्क मिळविणे आणि ते चित्रपट वायकॉम अठरा ओटीटीवर प्रदर्शित करण्याच्या व्यवसायात गुंतवणुकीबाबत होता. या व्यवसायात गुंतवणुक केल्यास त्यांच्यासह त्याच्या कंपनीला चांगला आर्थिक फायदा होईल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीसोबत व्यवसायात गुंतवणुक करण्याबाबत विनंती केली होती.
ही ऑफर चांगली वाटल्याने पूजा बॅनर्जी व तिचे पती कुणाल वमा्र यांनी त्यांच्यासोबत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी स्वतची शॅडो फिल्मस नावाची एक कंपनी सुरु केली होती. या कंपनीने शाम डे यांच्या कंपनीसोबत एक करार केला होता. या करारानंतर तिने त्यांना गुंतवणुकीसाठी 1 कोटी 68 लाखांची गुंतवणुक केली होती. हा संपूर्ण व्यवहार 9 एप्रिल ते 25 मे 2025 या कालावधीत झाला होता. मात्र ठरल्याप्रमाणे शाम डे व इतर दोघांनी चित्रपटाच्या प्रसारणाचे हक्क मिळवून दिले नाही. गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन पूजा बॅनजी आणि कुणाल वर्मा यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती, यावेळी त्याने त्यांना दहा लाख रुपये परत केले.
मात्र नंतर तिला प्रतिसाद देणे बंद केले. विविध कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न केला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बंगाली चित्रपटाचे निर्माते शाम डे व त्यांचे दोन सहकारी सारर्थी गुहा आणि नेताई मोंडल या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात शाम डे याच्याविरुदध अशाच प्रकारे कोलकाता येथील एका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीच्या नावाने त्याने मनिष सिंघनिया नावाच्या एका व्यक्तीची पावणेतीन कोटीची फसवणुक केली होती. त्यानंतर शाम डेविरुद्ध दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.