मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 जुलै 2025
मुंबई, – अंधेरीतील एका व्यावसायिकाच्या घरी झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत घरफोडीच्या गुन्ह्यांतील तीन आरोपीसह चोरीचे दागिने खरेदी करणारा सोने कारागिर अशा चारजणांच्या टोळील पोलिसांनी अटक केली. मोईनुद्दीन निजामुद्दीन शेख, मोहम्मद अली गुलाम नबी शेख, अकबरअली फतेह मोहम्मद राईन आणि नितीन रामचंद्र चिविलकर अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चार लाखांचे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याची तर पाचशे ग्रॅम वजनाची चांदीची लगड असा सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यात नाजीम आणि मारुती आंबेकर यांचा समावेश आहे.
दिनेश सुरेश उपाध्याय हे अंधेरीतील मरोळ पाईप रोड, आनंदनगर परिसरात राहत असून त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. 5 जुलैला रात्री उशिरा त्यांच्या घरात कोणीही नव्हते. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन 159 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध सोन्याचे, दोन किलो चांदीचे दागिने व चाळीस हजार रुपयांची कॅश असा साडेसात लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या दिवशी हा प्रकार दिनेश उपाध्याय यांना निदर्शनास येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार मोईनुद्दीन शेख हा दिसून आला हाता. घरफोडीनंतर तो त्याच्या दोन सहकार्यासोबत गुजरात आणि नंतर राजस्थानला पळून गेल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर अंधेरी पोलिसांच्या एका विशेष पथकाने मोईनुद्दीन शेख,, मोहम्मद अली आणि अकबरअली या तिघांनाही वडोदरा येथील सन्मान हॉटेलमधून शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या तिघांनाही अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणणत आले.
चोरीचे दागिने त्यांनी विरार येथे राहणारा सोने कारागिर नितीन चिविलकर याला दिले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने आरोपींकडून चोरीचे दागिने खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे सोन्या-चांदीचे वितळून बनविण्यात आलेली लगड पोलिसांनी जप्त केले. तपासात मोईनुद्दीन हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून चोरीचा उर्वरित दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.