मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 जुलै 2025
मुंबई, – मंगला एक्सप्रेसने कोकेनची तस्करीचा प्रकार एनसीबी-बंगलोर, आरपीएफ-मुंबई आणि गुन्हे गुप्तचर शाखेच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे कारवाई करुन हाणून पाडला. कोकेन तस्करीचा पर्दाफाश केल्यानंतर एका नायजेरीयन महिलेस अटक करण्यात आली आहे. या कारवाईत या अधिकार्यांनी सुमारे 36 कोटीचा कोकेनचा साठा जप्त केला आहे. एटुमुडोन डोरीस असे या महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मंगला एक्सप्रेसने एक विदेशी महिला प्रवास करत असून तिच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असल्याची माहिती बंगलोर युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांना मिळाली होती. ही माहिती नंतर मुंबई युनिटच्या रेल्वे पोलीस फोर्स आणि गुन्हे गुप्तचर शाखेला देण्यात आली होती. ही माहिती प्राप्त होताच मंगला एक्सप्रेस ही पनवेल रेल्वे स्थानकात संबंधित विदेशी महिलेचा शोध सुरु केला होता. यावेळी सीट क्रमांक 27 मध्ये बसलेल्या एटुमुडोन डोरीय या महिलेस या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी तिने ड्रग्ज बाळगल्याची कबुली दिली. त्यानंतर तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली होती.
त्यात या अधिकार्यांना आयताकृती काळे पॅकेज आढले. ड्रग्ज डिटेक्शन किटचा वापर केल्यानंतर त्यात कोकेन असल्याचे उघडकीस आले. तिच्या बॅगेतून या अधिकार्यांनी दोन किलो कोकेनसह दिड किलो मेथॅम्फेटामाईनचा साठा जप्त केला. त्याची किंमत सुमारे 36 कोटी रुपये इतकी आहे. अटकेनंतर तिला पुढील कारवाईसाठी एनसीबीच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर तिला बंगलोर शहरात पुढील चौकशीसाठी नेण्यात आले होते. तिला ते ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज ती कोणाला देणार होती. तिने यापूवी्रही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा तपास सुरु आहे. ड्रग्ज तस्करी करणारी एक आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.