विधानभवन राड्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
जितेंद्र आव्हाडविरुद्ध गुन्हा तर राड्यातील कार्यकर्त्यांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 जुलै 2025
मुंबई, – विधानभवन येथे झालेल्या राड्याप्रकरणी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात राड्याप्रकरणी दोन्ही आमदाराच्या समर्थक कार्यकर्त्यांसह कर्तव्य बजाविणार्या पोलीस कर्मचार्यांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. याप्रकरणी काही कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. विधानभवानातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने इतर आरोपींच्या अटकेसाठी मरिनड्राईव्ह पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गुरुवारी विधानभवन येथे राईट टू रिप्लायवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमदाराच्या कार्यकर्त्यांमध्ये तूफान राडा झाला होता. त्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला केला होता. या हल्ल्याची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गंभीर दखल घेत मरिनड्राईव्ह पोलिसांना दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रात्री उशिरा पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पडळकर यांचे समर्थक सर्जेराव बबन टकले आणि आव्हाड यांचे समर्थक नितीन हिंदूराव देशमुख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
गुन्हा दाखल होताच नितीन देशमुख यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याचा विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्याचे समर्थक कार्यकर्ते मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्याजवळ जमा झाले होते. यावेळी नितीन देशमुख यांना मारहाण झाली असताना त्यांना चौकशीसाठी का ताब्यात घेण्यात आले. कायदा अंमलबजावणी अधिकारी पक्षपाती करत असल्याचा आरोप करुन आव्हाड यांनी नितीन देशमुख यांच्या सुटकेची कारवाई केली होती. यावेळी पोलिसांनी सरकारी कर्मचार्यांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणला होता. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करुन त्यांना बाजूला करण्यात आला होता.
या घटनेनंतर रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी दुसर्या एका गुन्ह्यांच नोंद केली होती. त्यापूर्वी जितेंद्र आव्हाड हे आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी नितीन देशमुख यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित पोलिसांनी त्यांना भेटू दिले नाही. त्यांची योग्य ती माहिती दिली नाही.
दरम्यान विधानभवनातील झालेल्या राड्याप्रकरणी दोन्ही आमदाराच्या काही समर्थक कार्यकर्त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यापूर्वी या कार्यकर्त्यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. दरम्यान शुक्रवारी नितीन देशमुख यांना ताब्तया घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या मागील गेटजवळ आक्रमक धरणे आंदोलन सुरु केले होते.