हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड प्रियकराला चार महिन्यांनंतर अटक
प्रेयसीसह मित्रांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 जुलै 2025
मुंबई, – अनैतिक संबंधाला अडसर असलेल्या प्रेयसीच्या पतीची हत्या केल्यानंतर पळून गेलेल्या आरोपी प्रियकराला चार महिन्यानंतर दिडोंशी पोलिसांनी अटक केली. लुकमान ऊर्फ शाहरुख इस्लाम खान असे या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यांत अटक झालेला तो तिसरा आरोपी आहे. याप्रकरणी याच गुन्ह्यांत रंजू ऊर्फ रंजना चंद्रशेखर चौहाण आणि मैनूद्दीन लतिक खान या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. हत्येनंतर रंजनाचा प्रियकर शाहरुख हा पळून गेला होता. या सर्वांनी रंजनाचा पती चंद्रशेखर रामसिंग चौहाण याची गळा आवळून हत्या केली होती.
ही घटना 15 मार्च 2025 रोजी रात्री पावणेतीन वाजता गोरेगाव येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरील बंजारीपाडा, हमुलाल सेवा मंडळात घडली. याच ठिकाणी चंद्रशेखर हा त्याच्या पत्नी रंजूसोबत राहत होता. तिचे त्याच परिसरात राहणार्या शाहरुख खान याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाला चंद्रशेखर हा अडसर होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या हत्येची योजना बनविली होती. याकामी शाहरुखने त्याचे दोन मित्र शिवदास आणि मैनूद्दीनची मदत घेतली होती.
ठरल्याप्रमाणे 15 मार्चला ते तिघेही चंद्रशेखर याच्या घरी आले होते. त्यानंतर या तिघांनी रंजूच्या मदतीने चंद्रशेखरची गळा आवळून हत्या केली होती. या हत्येनंतर ते चौघेही पळून गेले होते. हा प्रकार उघडकीस येताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शवविच्छेदन अहवालात ही हत्या असल्याचे उघडकीस आले होते. या अहवालानंतर पोलिसांनी चंद्रशेखरची पत्नी रंजू चौहाण, प्रियकर शाहरुख खान, दोन मित्र शिवदास आणि मैनूद्दीन यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच रंजू, प्रियकराचा मित्र मैनुद्दीन या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र शाहरुख आणि शिवराम हे दोघेही पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हताी घेतली हातेी. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या शाहरुखला अखेर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.