मौजमजा करण्यासाठी एक कोटीचा सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
ज्वेलर्स दुकानाच्या सेल्समनला ६२ लाखांच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मार्च २०२४
ठाणे – मद्यप्राशनसह मौजमजा करण्यासाठी ठाण्यातील एका ज्वेलर्स दुकानातील सेल्समनने सुमारे एक कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन व्यापार्याची फसवणुक केली. याप्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी सेल्समनला नौपाडा पोलिसांनी शिताफीने मिरारोड येथून अटक केली. राहुल जयंतीलाल मेहता असे या आरोपी सेल्समनचे नाव असून त्याच्याकडून अपहार केलेल्या सुमारे ६२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्याकडून लवकरच उर्वरित दागिने हस्तगत केले जाणार आहेत. पोलिसांना सतत गुंगारा देणारा राहुल हा मिरारोड येथे त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला आणि पकडला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरेश पारसमल जैन हे व्यवसायाने सोन्याचे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत ठाण्यातील डॉ. मुस रोड, लेक व्हयू दोनच्या राजवंत अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या मालकीचे एक सोन्याचे दुकान असून तिथेच आरोपी राहुल मेहता हा सेल्समन म्हणून कामाला होता. त्याच्यावर सोन्याचे दागिने विक्रीची जबाबदारी होती. त्यासाठी त्याला सुरेश जैन यांनी ३८ छोटे-मोठे नेकलेस/हार, २४ जोडी कर्णफुले, तीन सोन्याची चैन, पाच सोन्याचे बाजूबंद असा सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांचे १५९९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिले होते. या दागिन्यांचा अपहार करुन त्याने सुरेश जैन यांची फसवणुक केली होती. दागिन्यांसह राहुल हा पळून गेल्याचे लक्षात येताच सुरेश जैन यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर राहुलविरुद्ध पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत नौपाडा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक शरद कुंभार यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील, दत्तात्रय लोंढे, पोलीस हवालदार गायकवाड, पाटील, देसाई, रांजणे, गोलवड, तडवी, विरकर, पोलीस नाईक माळी, पोलीस शिपाई कांगणे, तिर्थकर यांनी तपास सुरु केला होता.
आरोपीचा त्याच्या राहत्या घरासह नातेवाईक तसेच नातेवाईकांकडून शोध घेतला असता तो ८ मार्चपासून कामावर येत नव्हता. काही दिवसांनी तो त्याच्या घरातून निघून गेला होता. त्याच्या पत्नीला त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्याचा मोबाईलही बंद येत होता. त्यामुळे १५ मार्चला तिने राहुलची मिसिंग तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. चौकशीदरम्यान राहुल हा ठाण्यातून पळून गेल्यानंतर मुंबई, इंदौर, गुजरात येथे गेल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या अटकेसाठी संबंधित पोलीस टिम तिथे गेले होते, मात्र पोलीस पोहचण्यापूर्वीच तो पळून जात होता. याच दरम्यान राहुल हा मिरारोड येथे त्याच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून राहुल मेहता याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याची कुली दिली. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. मद्यप्राशन तसेच मौजमजेसाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने सुरेश जैन यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून विविध व्यापार्यांना विक्रीसाठी एक कोटीचे सोन्याचे दागिने घेतले. या दागिन्यांची त्याने त्याच्या परिचित व्यापार्यांना विक्री करुन जिवाची मुंबई केली होती. सुरुवातीला तो दुकानात सोन्याचे दागिने चोरी करत होता. हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. त्यामुळे त्याने विक्रीसाठी घेतलेल्या दागिन्यांचा अपहार केला होता. या दागिन्यांची विक्री करुन त्याला इतर राज्यात कायमचे स्थायिक व्हायचे होते, मात्र मैत्रिणीला भेटण्यासाठी आल्यानंतर तो पकडला गेला. त्याच्याकडून पोलिसांनी २६ नेकलेस-हार, २१ कानातील कर्णफुले, तीन सोन्याची चैन असा सुमारे ९०० ग्रॅम वजनाचे ६२ लाख १० हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.