मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंबई, – लिफ्टमधून घरी जाताना लिफ्टमनने एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना माझगाव येथील उच्चभू सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी बळीत मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरुन भायखळा पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन 29 वर्षांच्या लिफ्टमन आरोपीस अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
40 वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचा इलेक्ट्रीकचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत माझगाव येथील पॉश सोसायटीमध्ये राहतात. त्यांना दहा वर्षांची मुलगी आहे. शनिवारी 19 जुलैला त्यांची मुलगी लिफ्टमधून तिच्या 32 व्या मजल्यावरील घरी जात होती. यावेळी लिफ्टमन असलेल्या आरोपीने लिफ्टमध्येच तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि घरी येताच तिने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला होता.
ही माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांनी आरोपी लिफ्टमनविरुद्ध भायखळा पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याने पोलीस कोठडी सुनावली आहे.