खोदकाम मिळालेले सोने स्वस्तात देण्याच्या आमिषाने फसवणुक
बोगस नाणी देऊन पळून गेलेल्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंबई, – घराचे खोदकाम करताना पाच किलो सोन्;याचे नाणी सापडल्याचा दावा करुन 250 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणी अवघ्या सहा लाखांमध्ये देते असे सांगून एका महिलेची दोन ठग महिलांनी फसवणुक केल्याचा प्रकार कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आला आहे. सहा लाख रुपये घेतल्यानंतर बोगस नाणी देऊन पळून गेलेल्या दोन महिलांविरुद्ध चारकोप पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या महिलांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मीनादेवी मोहन चौहाण ही महिला कांदिवलील चारकोप परिसरात राहते. तिचा मुलगा एसी रिपेरिंगचे काम करत असून या कामातून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. शुक्रवारी मीनादेवी ही तिच्या घरी होती. यावेळी तिच्या घरी दोन महिला आल्या होत्या. त्यांनी त्या दोघीही दूध आणि दही व्यवसायात असल्याचे सांगून त्यांच्याकडून दही आणि दूध घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे ती त्यांच्याकडून दही आणि दूध घेत होती. याच दरम्यान या दोघींनी तिला त्यांच्या पालघर येथील घराचे खोदकाम करताना तिला पाच किलो सोने सापडले आहे. ते सोने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत देते असे सांगून तिला सोने खरेदी करण्यास प्रवृत्त केले होते.
स्वस्तात सोने मिळत असल्याने तिनेही सोने खरेदीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. 23 जूनला त्या दोघीही तिच्याकडून आले आणि त्यांनी तिला 250 ग्रॅम वजनाचे सोने पाच ते सहा लाखांत देण्याचे आश्वासन दिले होते. तिचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी तिला एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे दिले होते. ते नाणे तिने एका सोनाराकडे विकले, त्यातून तिला दहा हजार रुपये मिळाले होते. ही माहिती तिने त्याच्या मुलाला सांगितली, मात्र त्याने अशा प्रकारे कुठलाही व्यवहार करण्यास तिला नकार दिला होता. त्यामुळे तिने सोने खरेदी करण्यास त्या दोघींना नकार दिला होता.
18 जुलैला तिच्या पतीचे मित्र नूरमोहम्मद शेख यांनी व्यवसायातील सहा लाख रुपये तिच्याकडे ठेवण्यसाठी दिले होते. याच दरम्यान तिथे त्या दोघीही पुन्हा आल्या होत्या. त्यांनी तिला सोने खरेदीसाठी आग्रह करुन तिला त्यातून चांगला फायदा होईल असे सांगतले. त्यामुळे तिने त्यांना सहा लाख रुपये दिले होते. त्यामोबदल्यात त्यांनी तिला काही सोन्याचे नाणी दिले होते. काही वेळानंतर त्या दोन्ही महिला तेथून निघून गेल्या. त्यानंतर तीदेखील तिच्या परिचित सोनाराकडे संबंधित नाणी विक्रीसाठी गेली होती.
मात्र या नाणीची तपासणी केल्यानंतर त्या नाणी सोन्याचे नसून पितळ आहे, सर्व नाणी बोगस असल्याचे सांगून तिची संबंधित महिलांनी फसवणुक केल्याचे सांगितले. फसवणुकीच्या या प्रकारानंतर तिने घडलेला प्रकार चारकोप पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या दोन्ही महिलांचा शोध सुरु केला आहे. या महिलांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.