मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंंबई, – दारुच्या नशेत सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच पित्याने भाजी कापण्याच्या चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. या हल्ल्यात मुलाच्या उजव्या हाताला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी पिता परशुराम बसप्पा कांबळे याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती.
यश हा सतरा वर्षांचा मुलगा असून तो सध्या अंधेरीतील एमआयडीसी, आर्शिवाद सोसायटीमध्ये त्याची आई रेखा, वडिल परशुराम, चौदा वर्षांच्या बहिणीसोबत राहतो. त्याची आई घरकाम करते तर त्याचे वडिल परशुराम काहीच कामधंदा करत नाही. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. शनिवारी 19 जुलैला तो त्याच्या घरी टिव्ही पाहत होता. दुपारी साडेतीन वाजता त्याचे वडिल परशुराम हे दारुच्या नशेत घरी आले. घरी येताच त्यांनी विनाकारण शिवीगाळ घालून वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तो घराबाहेर पडला आणि त्याने फोनवरुन ही माहिती त्याच्या आईला सांगितली.
रात्री पावणेनऊ वाजता त्याची आई घरी आली होती. यावेळी परशुरामने यशसह त्याच्या आईला शिवीगाळ करुन त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने भाजी कापण्याच्या चाकूने त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या उजव्या हाताला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेल्या यशला स्थानिक रहिवाशांनी जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी यशची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्या वडिलांविरुद्ध गंभीर दुखापत करणे आणि अल्पवयीन न्याय कायदा कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. शनिवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.