मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 जुलै 2025
मुंबई, – कार-बाईकची समोरासमोर धडक लागून झालेल्या अपघातात सुहेल शकील अन्सारी या 36 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा बाईकस्वार मित्र अबू फैजान एहसानुल हक्क अन्सारी हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यापप्रकरणी सायन पोलिसांनी कारचालक चंदूलाल विरचंद जैन याच्याविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
हा अपघात रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास सायन येथील डॉ. बी. ए रोड, सायन ब्रिजवरील उत्तर वाहिनीवर झाला. अबू फैजान एहसानुल हक्क अन्सारी हा कुर्ला येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. रविवारी तो त्याचा मित्र सुहेलसोबत त्याच्या बाईकवरुन कुर्ला येथील विनोबा भावे नगर, एलआयजी कॉलनी येथून मरिनड्राईव्ह येथे गेला होता. रात्री साडेदहा वाजता ते दोघेही मरिनड्राईव्ह येथून सायन येथे आले. त्यानंतर ते दोघेही चेंबूरच्या दिशेने जात होते.
ही बाईक सायन ब्रिजच्या उत्तर वाहिनीवरुन जाताना अचानक त्यांच्यासमोर एक कार आली आणि कारने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. त्यात त्यांची बाईक स्लीप होऊन ते दोघेही जखमी झाले होते. सुहेलच्या चेहर्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत होते. अपघाताची माहिती मिळताच तिथे सायन पोलीस आले. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पोलिसांनी जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमघ्ये दाखल केले होते.
उपचारादरम्यान सुहेलचा मृत्यू झाला तर जखमी अबू अन्सारीवर तिथेच उपचार सुरु करण्यात आले होते. याप्रकरणी अबू अन्सारीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर पोलिसांनी कारचालक चंदूलाल जैन याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस तर दुसर्या गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत कारवाईनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.