विदेशी महिलांच्या मदतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
एंपायर सूट हॉटेलमध्ये कारवाई; तीन विदेशी महिलांची सुटका
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जुलै 2025
मुंबई, – विदेशी महिलांच्या मदतीने सुरु असलेल्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंधेरीतील एंपायर सूट या हॉटेलमध्ये हा सेक्स रॅकेट सुरु होता, याप्रकरणी हॉटेलचा मालक अब्दुल सलाम आणि मॅनेजर आलम खलील चौधरी यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय सहितेसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत आलम चौधरीला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी व्हिएतनामच्या तीन विदेशी महिलांची सुटका केली असून मेडीकलनंतर या तिघींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, टाईम स्केअर इमारतीजवळील बालाजी बिजनेस पार्कमध्ये एंपायर सूट नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावर काही विदेशी महिलांना ठेवण्यात आले असून त्यांच्या मदतीने हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत एमआयडीसी पोलिसांना या संपूर्ण माहितीची शहानिशा करुन दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरव, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काशिद, पोलीस हवालदार बडे, पोलीस शिपाई शिंगाने, जाधव, अवघडे, महिला हवालदार घाग, महिला पोलीस शिपाई भोपळे, चव्हाण, मोरे यांनी एंपायर हॉटेल परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. त्यापूर्वी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाला तिथे पाठवून त्याची शहानिशा करण्यास सांगितले होते. त्यामुळे संबंधित बोगस ग्राहक तिथे गेला होता. हॉटेलचा मॅनेजर आलम चौधरीशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्याने त्याला आठव्या मजल्यावर नेले. चर्चेनंतर त्याने त्याला सहा हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्याला हॉटेलच्या एका रुममध्ये पाठविण्यात आले. तिथे एक विदेशी महिला होती.
तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने दुसर्या रुममध्ये तिचे दोन सहकारी महिला असल्याचे सांगितले होते. तिच्यासह त्या दोघीही तिथे वेश्याव्यवसाय करत असल्याची कबुली दिली होती. बोगस ग्राहकाकडून सिग्नल प्राप्त होताच या पथकाने आठव्या आणि नवव्या मजल्यावर कारवाई करुन तिन्ही विदेशी महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत हॉटेलचा मॅनेजर आलम चौधरी हा त्यांना ग्राहक आणून देत असल्याचे सांगितले. त्यासाठी ऑनलाईन वेबसाईटवर त्याने एका एजंटचा मोबाईल क्रमांक दिला होता. या एजंटला संपर्क साधल्यानंतर तो हॉटेलसह महिलांचे फोटो ग्राहकांना पाठवत होता. त्यानंतर त्यांच्यात फोनवरुन सविस्तर चर्चा होत होती.
या चर्चेनंतर ग्राहकाला संबंधित हॉटेलमध्ये पाठविले जात होते. हॉटेलमधील सेक्स रॅकेट हॉटेलचा मालक खलील चौधरी याच्या सांगण्यावरुन चालत होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर खलील आणि आलम या दोघांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर मॅनेजर आलम चौधरीला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तीन विदेशी महिलांची सुटका केली असून त्या तिघीही व्हिएतनामच्या रहिवाशी आहे. त्यांचे पासपोर्ट पोलिसांनी जप्त केले आहे. मेडीकलनंतर या तिघींनाही महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. या तिघींची माहिती व्हिएतनाम दूतावास कार्यालयाला देण्यात आली आहे.