मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जुलै 2025
मुंबई, – मालाडच्या अग्रवाल हॉस्पिटलमधून चेकअप करुन घरी जात असताना भरवेगात जाणार्या अज्ञात वाहनाच्या धडकेने 52 वर्षांच्या पादचारी महिलेचा मृत्यू झाला. वंदना अतुल गाला असे या मृत महिलेचे नाव असून ती कांदिवलीतील रहिवाशी आहे. अपघातानंतर आरोपी वाहनचालक घटनास्थळाहून पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
हा अपघात बुधवारी रात्री आठ ते सव्वाआठच्या सुमारास मालाड येथील मार्वे रोड सिग्नल, मेगसन्स शॉपसमोर झाला. परेश प्रेमजी विरा हे बोरिवली परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून त्यांचा कर्टन शॉप आहे. मृत वंदना ही त्यांची लहान बहिण असून ती कांदिवली येथे राहते. बुधवारी 23 जुलैला ती वैद्यकीय तपासणीसाठी मालाडच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये गेली होती. चेकअप पूर्ण झाल्यानंतर ती तिच्या घरी जात होती. मार्वे रोड रोड सिग्नलजवळील मेगसन्स शॉपसमोरुन जाताना भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने तिला जोरात धडक दिली होती.
त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिथे उपस्थित स्थानिक लोकांनी तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. ही माहिती परेश विरा यांना त्यांचा भाऊ शैलेश विराकडून समजली होती. त्यामुळे ते शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांना वंदनाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समजली होती. अपघाताची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी परेश विरा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका पादचारी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर आरोपी वाहनचालक जखमी महिलेला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.